एफसी गोवावर पुन्हा पराभवाची नामुष्की; कमाराच्या गोलमुळे नॉर्थईस्ट विजयी

मॉरितानियाचा मध्यरक्षक खासा कमारा (Khasa Kamara) शनिवारी रात्री नॉर्थईस्ट युनायटेडच्या (Northeast United) विजयाचा शिल्पकार ठरला.
Northeast United
Northeast UnitedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मॉरितानियाचा मध्यरक्षक खासा कमारा (Khasa Kamara) शनिवारी रात्री नॉर्थईस्ट युनायटेडच्या (Northeast United) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटास केलेल्या सणसणीत फटक्यावरील गोलमुळे एफसी गोवावर (FC Goa) इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की आली. खलिद जमिल (Khalid Jamil) यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने यंदाच्या स्पर्धेत प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई करताना सामना 2-1 फरकाने जिंकला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत 29 वर्षीय कमारा याने 90+3व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. त्याचा आयएसएलच्या दोन मोसमातील पहिलाच गोल ठरला. त्यापूर्वी रोछार्झेला याने 10व्या मिनिटास नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिली होती, नंतर 13व्या मिनिटास अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याने एफसी गोवास बरोबरी साधून दिली होती.

Northeast United
ईस्ट बंगालची चेन्नईयीनशी गोलशून्य बरोबरी

नॉर्थईस्ट युनायटेडचा हा चार लढतीतील पहिलाच विजय ठरला. अगोदर एक बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी असलेल्या गुवाहाटीच्या संघाचे आता चार गुण झाले आहेत. एफसी गोवाची निराशाजनक मालिका कायम राहिली. त्यांना सलग तिसऱ्या पराभवामुळे शून्य गुणासह तळाच्या अकराव्या क्रमांकावर राहावे लागले. एफसी गोवाने स्पर्धेतील तीन सामन्यांत आता तब्बल आठ गोल स्वीकारले आहेत.

पूर्वार्धात गोलबरोबरी

सामन्याच्या सुरवातीस एफसी गोवास बचावफळीतील त्रुटींची किंमत मोजावी लागली. त्यामुळे गुवाहाटीच्या संघास आघाडी मिळाली. मथायस कुरियर याच्या असिस्टवर रोछार्झेला याने एफसी गोवाच्या गोलपोस्टसमोर फक्त गोलरक्षक धीरज सिंग एकटाच असल्याची सुरेख संधी साधली. मात्र तीन मिनिटानंतर अलेक्झांडर जेसूराज याच्या गोलमुळे एफसी गोवाने पिछाडी भरून काढली. आल्बर्टो नोगेराच्या असिस्टवर जेसूराजने प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुभाशिष रॉयला चकविले. यावेळी सुरवातीची चाल होर्गे ओर्तिझ याने रचली होती. गोलबरोबरीनंतर लगेच नॉर्थईस्टने संघात पहिला बदल केला. 17व्या मिनिटाल प्रशिक्षक खलिद जमिल यांनी प्रोवात लाक्रा याच्या जागी ज्यो जोहेर्लियाना याला संधी दिली.

Northeast United
ईस्ट बंगालची चेन्नईयीनशी गोलशून्य बरोबरी

एफसी गोवा संघात बदल

एफसी गोवा संघाने दोन पराभवानंतर संघात आज बदल केले. गतमोसमात नॉर्थईस्टकडून खेळलेल्या ऑस्ट्रेलियन डायलन फॉक्स एफसी गोवातर्फे पहिला सामना खेळला. नियमित कर्णधार एदू बेदिया याच्याऐवजी स्पॅनिश सहकारी इव्हान गोन्झालेझ याच्याकडे नेतृत्व देण्यात आले. सामन्यातील नऊ मिनिटे बाकी असताना बेदिया मैदानात उतरला. स्पॅनिश आघाडीपटू ऐरान काब्रेरा यालाही एफसी गोवा संघात स्थान मिळाले नाही.

नको असलेली नामुष्कीजनक हॅटट्रिक

- आयएसएल इतिहासात एफसी गोवा संघाला दुसऱ्यांदा मोसमात सुरवातीचे 3 सामने गमवावे लागले

- 2016 मध्ये झिको यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे नॉर्थईस्ट युनायटेड (0-2), एफसी पुणे सिटी (1-2), चेन्नईयीन एफसी (0-2) संघाविरुद्ध पराभव

- आता 2021-22 मध्ये हुआन फेरांडो प्रशिक्षक असताना प्रारंभीच्या 3 सामन्यात अनुक्रमे मुंबई सिटी (0-3), जमशेदपूर एफसी (1-3), नॉर्थईस्ट युनायटेड (1-2) संघाकडून हार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com