

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते, पण फॅनी उटागुशिमानिंदे हिने हे स्वप्न केवळ सत्यात उतरवले नाही, तर पहिल्याच सामन्यात दोन मोठे जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. नायजेरिया इन्व्हिटेशनल महिला टी-२० टूर्नामेंटमध्ये घाना विरुद्ध खेळताना रवांडाच्या या युवा खेळाडूने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. केवळ १५ वर्षे २२३ दिवस वय असताना फॅनीने केलेली ही खेळी महिला आणि पुरुष अशा दोन्ही क्रिकेट प्रकारात मैलाचा दगड ठरली आहे.
या सामन्यात फॅनीने केवळ ६५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १११ धावांची तुफानी खेळी केली. या शतकासह ती आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम फ्रान्सच्या गुस्ताव मॅकॉनच्या नावावर होता, ज्याने १८ वर्षे २८० दिवस वय असताना स्वित्झर्लंडविरुद्ध शतक ठोकले होते. फॅनीने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हा विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला आहे.
फॅनीने केवळ वयाचाच विक्रम मोडला नाही, तर पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या करेन रोल्टन यांनी इंग्लंडविरुद्ध नाबाद ९६ धावा केल्या होत्या. फॅनीने १११ धावा करत हा विक्रम मागे टाकला आहे. विशेष म्हणजे, महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
फॅनीच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर रवांडा संघाने २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. १५ वर्षांच्या या मुलीने मैदानावर दाखवलेला संयम आणि आक्रमकता पाहून अनुभवी खेळाडूही थक्क झाले आहेत. तिच्या या खेळीमुळे रवांडासारख्या उदयोन्मुख क्रिकेट राष्ट्राचे नाव आता जागतिक स्तरावर अभिमानाने घेतले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.