Ethan Vaz : जॉर्जियातील बाटुमी येथे झालेल्या जागतिक कॅडेट्स (12 वर्षांखालील) बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात गोव्याच्या एथन वाझ याला पदक हुकले, पण याच स्पर्धेच्या कालावधीत घेतलेल्या बुद्धिबळ डाव सोडविण्याच्या स्पर्धेत त्याने भारतासाठी रौप्यपदक जिंकले.
बुद्धिबळ डाव सोडविण्याच्या स्पर्धेत एथनने 12 वर्षांखालील गटात 40 पैकी 36 गुण नोंदविले. रुमानियाच्या हेन्री तुडोर याने 39 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर स्पेनच्या ॲलेक्स टोर्नेरो याला 34 गुणांसह ब्राँझपदक मिळाले. रौप्यपदक कामगिरीमुळे एथनला ‘फिडे’कडून रौप्यपदक व ‘डिप्लोमा’ प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
जागतिक कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात (मुख्य फेरीत) एथन दहाव्या फेरीतपर्यंत दुसऱ्या स्थानी होता. सलग चार डाव जिंकल्यानंतर त्ला रशियाच्या अर्तेम उस्कोव याने पाचव्या फेरीत हरविले. मात्र अखेरच्या फेरीत पुन्हा पराभूत झाल्यामुळे एथनचे पदक हुकले. दहाव्या मानांकित कझाखस्तानच्या सौआत नुर्गालियेव याच्याविरुद्ध एथनला रौप्यपदकासाठी बरोबरी पुरेशी होती, परंतु तो अपेक्षित निकाल प्राप्त करू शकला नाही. या स्पर्धेत 156 खेळाडूंत त्याला 35 वे मानांकन होते.
2000 एलो गुणांचा टप्पा ओलांडणार
जागतिक कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे एथनने 174 एलो गुणांची कमाई केली. तो आता जागतिक मानांकनात 2000 एलो गुणांचा टप्पा गाठेल. आगामी मानांकनात त्याचे 2059 एलो गुण होतील. बुद्धिबळ डाव सोडविण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले, पण मुख्य स्पर्धेत पदक जिंकण्यास अपयश आल्यामुळे निराशा झाल्याची प्रतिक्रिया एथनने दिली. सुवर्णपदक जिंकणे हेच आपले ध्येय होते, असे त्याने नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.