England vs West Indies, 2nd ODI: इंग्लंडचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. स्पर्धेतील दुसरा सामना बुधवारी (6 डिसेंबर) सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झाला. या सामन्यात इंग्लिश संघाने 103 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान संघाचा कर्णधार जोस बटलर वेगळ्या अंदाजात दिसला. आपल्या संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 128.88 च्या स्ट्राइक रेटने 45 चेंडूत 58 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन उत्कृष्ट षटकार आले.
दरम्यान, या सामन्यात त्याने एक विशेष कामगिरीही केली. इंग्लंडसाठी वनडे फॉरमॅटमध्ये 5,000 हून अधिक धावा करणाऱ्या खास खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला आहे. इंग्लंडसाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विशेष विक्रम माजी कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावावर आहे. मॉर्गनने इथे इंग्लिश संघासाठी 207 डावांमध्ये सर्वाधिक 6957 धावा केल्या आहेत. मॉर्गननंतर जो रुट (6,522) दुसऱ्या स्थानावर, इयान बेल (5,416) तिसऱ्या स्थानावर, पॉल कॉलिंगवूड (5,092) चौथ्या स्थानावर आणि जोस बटलर (5022) पाचव्या स्थानावर आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅरेबियन संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 39.4 षटकांत 202 धावा करुन बाद झाला. वेस्ट इंडिज संघाकडून कर्णधार शे होपने सर्वाधिक धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने संघासाठी 68 चेंडूत सर्वाधिक 68 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय, शेरफेन रदरफोर्डने 80 चेंडूत 63 धावा केल्या. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने दिलेले 203 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 32.5 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. इंग्लिश संघाच्या डावाची सुरुवात करताना विल जॅकने 72 चेंडूत 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय, कर्णधार जोस बटलरने नाबाद 58 धावा केल्या. त्याच्या खेळीने संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.