Ashes 2023: मालिका बरोबरीत सुटली, तरी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ICC ने कापले WTC पाँइंट्स

England Face Huge WTC Setback: ऍशेस 2023 मालिकेनंतर इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपमधील तब्बल 19 आणि ऑस्ट्रेलियाचे 10 पाँइंट्स कापण्यात आले असून, यामागील कारण जाणून घ्या.
Ben Stokes and Pat Cummins
Ben Stokes and Pat CumminsDainik Gomantak
Published on
Updated on

England Lose 19 WTC points and Australia 10 for Slow Over-Rates During the Ashes 2023:

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच 5 सामन्यांची ऍशेस 2023 मालिका झाली. या अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ऍशेस ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. मात्र, असे असले तरी या दोन्ही संघांवर कारवाई करण्यात आली आहे.

या ऍशेस मालिकेने आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशीप 2023-2025 स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्यामुळे नव्या नियमानुसार कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वात पहिल्याच मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला षटकांची गती कमी राखल्याने सामनाशुक्ल कपातीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तसेच त्यांना कसोटी चॅम्पियनशीपमधील गुणही गमवावे लागले आहेत.

कसोटी चॅम्पियनशीपच्या नियमानुसार सामन्यातील निर्धारित वेळेपेक्षा प्रत्येक उशीरा टाकलेल्या षटकासाठी 5 टक्के दंड आकारला जातो आणि एक गुण गमवावा लागतो. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने 10 गुण गमावले आहेत. तसेच इंग्लंडने 19 गुण गमावले आहेत.

Ben Stokes and Pat Cummins
Ashes 2023: ऍशेस मालिकेत 'या' 5 फलंदाजांनी सोडली छाप, उस्मान ख्वाजाने काढल्या सर्वाधिक धावा

ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत 10 षटके उशीरा टाकली होती. त्यामुळे त्यांना 10 गुण गमवावे लागेल आणि 50 टक्के दंड झाला. तसेच इंग्लंडने ऍशेस मालिकेतील पाचही सामन्यांत मिळून 19 षटके उशीरा टाकली आहेत.

इंग्लंडने एजबस्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत 2 षटके, लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटीत 9 षटके, ओल्ड ट्रॅफर्डला झालेल्या चौथ्या कसोटीत 3 षटके आणि ओव्हलला झालेल्या पाचव्या कसोटीत 5 षटके उशीरा टाकली. त्यामुळे त्यांचे 19 गुण कापण्यात आले.

याशिवाय पहिल्या कसोटीत इंग्लंडला 10 टक्के, दुसऱ्या कसोटीत 45 टक्के, चौथ्या कसोटीत 15 टक्के आणि पाचव्या कसोटीत 25 टक्के दंड झाला आहे.

Ben Stokes and Pat Cummins
Ashes Ball-Change Controversy: ऍशेसमध्ये चेंडू बदलण्यावरुन वाद, पाँटिंगने केली चौकशीची मागणी; ख्वाजा म्हणाला...

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपच्या नियमानुसार प्रत्येक विजयी सामन्यासाठी संघाला 12 गुण दिले जातात. तसेच बरोबरी झालेल्या सामन्यासाठी 6, तर अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण मिळतात. तसेच संघांच्या विजयी टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित केली जाते.

सध्या कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वात ऍशेस 2023 मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया 18 गुण आणि 30 च्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंड 9 गुणांसह 15 च्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे.

अव्वल क्रमांकावर पाकिस्तान आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यातील विजयांमुळे पाकिस्तानचे 24 गुण असून 100 च्या टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघाचे 16 गुण झाले असून विजयी टक्केवारी 66.67 आहे. यासह भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 4 गुण आणि 16.67 टक्केवारी आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com