Durand Cup 2023 Highlights : गोलरक्षक धीरज सिंग आणि बचावपटू संदेश झिंगन यांच्या चुका एफसी गोवा संघाला शनिवारी महागात पडल्या, त्यामुळे सामन्यावर वर्चस्व राखूनही त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 2-2 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले, परिणामी 132व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरी प्रवेशासाठीही प्रतीक्षा करावी लागली.
गुवाहाटी येथे शनिवारी एफसी गोवाने सलग विजय नोंदविला असता, तर सहा गुणांसह त्यांची ‘ड’ गटातून बाद फेरी निश्चित झाली असती. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, त्यामुळे एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रत्येकी चार गुण झाले.
मात्र नॉर्थईस्टच्या (+६) तुलनेत एफसी गोवासाठी (+८) सरस गोलसरासरी दिलासा देणारी आहे. सध्या गोव्यातील संघ गटात अव्वल आहे. हे दोन्ही संघ शेवटच्या साखळी लढतीत नवोदित डाऊनटाऊन हिरोज संघाविरुद्ध खेळतील. एफसी गोवाचा सामना १६ ऑगस्ट रोजी होईल.
सदोई याचा निर्णायक पेनल्टी गोल
गोलक्षेत्रात सहकारी खेळाडू नसताना जागा सोडून पुढे येत फटका मारण्यास विलंब करण्याची गोलरक्षक धीरज याची चूक एफसी गोवा संघाला नडली. मनवीर सिंग याने मोकळ्या गोलनेटसमोर आयती संधी साधत 24व्या मिनिटास नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिली.
रॉलिन बोर्जिसने सलग दुसऱ्या सामन्यात गोल केल्यामुळे एफसी गोवाने ४५+४व्या मिनिटास बरोबरी साधली. कर्णधार ब्रँडन फर्नांडिसच्या कॉर्नर फटक्यावर रॉलिनने सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक मिर्षाद मिचू याला संधीच दिली नाही.
५२व्या मिनिटास मनवीर सिंगच्या क्रॉस पासवर संदेश झिंगनने चेंडू स्वतःच्या संघाच्या गोलनेटमध्ये मारल्यामुळे गुवाहाटीच्या संघाला २-१ अशी पुन्हा आघाडी मिळाली. शिलाँग लाजाँगविरुद्ध ६-० फरकाच्या विजयात तीन गोल केलेला मोरोक्कन नोआ सदोई शनिवारच्या सामन्यात बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरला आणि दोन सामन्यातील चौथा गोल करताना ८०व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर त्याने संघाला २-२ अशी गोलबरोबरी साधून दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.