पणजी: केंद्र सरकारच्या कोविड-19 निर्देशानुसार आणि 144 कलम लागू असल्याने उत्तर आणि दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकाऱ्यांनी अनुक्रमे तिसवाडी तालुका आणि सासष्टी (Salcete) तालुका बुद्धिबळ संघटनेस रविवारी (ता. 27) व्यवस्थापकीय समितीची निवडणूक घेण्यास परवानगी नाकारली. (Goa: District collector denied permission to the managing committee of the chess association to hold elections.)
गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी शनिवारी संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तालुका संघटनेच्या निवडणुका आता ठरल्यानुसार रविवारी होणार नाहीत, तर पेडणे तालुक्यात इतर पदाधिकारी बिनविरोध ठरल्यामुळे फक्त उपाध्यक्ष व सचिवपदासाठी रविवारी निवडणूक होईल. याठिकाणी दोन पदासाठी निवडणूक सरकारच्या कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करून होईल.
बांदेकर यांनी सांगितले, की "तिसवाडी आणि सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने निवडणुकीच्या परवानगीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केला होता. त्यानुसार परिस्थितीनुरुप परवानगी नाकारण्यात आली. राज्य सरकारच्या संचारबंदी निर्देशानुसार, पुढील आठवड्यात निवडणूक घेण्यास परवानगी मिळू शकते, पण अजून निर्णय झालेला नाही."
राज्य सरकारने कोरोना विषाणू महामारी अनुषंगाने राज्यातील संचारबंदी पाच जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी जाहीर केले. तालुका संघटनांनी कोविडविषयक शिष्टाचारांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिल्यास त्यांना निवडणुकीसाठी परवानगी मिळू शकेल, असे बांदेकर यांना वाटते. सरकारने परवानगी दिली तरच दोन्ही तालुका संघटना निवडणुका घेऊ शकतील, असे त्यांनी नमूद केले.
गोवा बुद्धिबळ संघटनेशी एकूण 12 तालुका संघटना संलग्न आहेत. त्यापैकी नऊ संघटनांच्या व्यवस्थापकीय समिती बिनविरोध ठरल्या आहेत. पेडणे तालुका निवडणूक रविवारी होईल. फक्त दोन संघटनांच्या निवडणुका बाकी राहतील. दोन्ही ठिकाणी दोन गटात थेट लढत आहे. "सर्व बाराही तालुका संघटनांची मुदत 30 जून रोजी संपत आहे, पण कोविड-19 निर्देशानुसार नियमाचे पालन करावेच लागेल. संघटनांची मुदत संपत असल्यासंदर्भात मी जिल्हा निबंधकांशी बोललो असून त्यांनी संदर्भात आवश्यक ठराव मंजूर करून त्या बैठकीचे इतिवृत्त सादर करण्यास सांगितले आहे", अशी माहिती बांदेकर यांनी दिली.
यामुळे तालुका बुद्धिबळ निवडणुका रद्द
- उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार 144 कलम लागू
- तिसवाडी तालुका निवडणुकीत 119 मतदार, 113 सदस्य व 6 क्लब
- सासष्टी तालुका निवडणुकीत 56 मतदार, 49 सदस्य व 7 क्लब
- पेडणे तालुक्यात फक्त 27 सदस्य, त्यामुळे परवानगी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.