वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धची साखळी फेरी आता अखेरच्या टप्प्यात आहे. दरम्यान, यंदा डब्ल्युपीएलचा हा दुसरा हंगाम असून या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे प्लेऑफमधील उर्वरित एका जागेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स या संघात चूरस आहे.
डब्लुपीएलमध्ये सहभागी पाच संघांमधील गुणतालिकेत पहिल्या तीन क्रमांकावरील संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतात. तसेच अव्वल क्रमांकाचा संघ थेट अंतिम सामना गाठतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या संघात एलिमिनेटर सामना खेळवण्यात येतो. एलिमिनेटमधील विजेता अंतिम सामन्यात पोहचतो.
दरम्यान, सध्या दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत 10 गुण मिळवले आहेत. पण नेट रन रेटच्या फरकामुळे दिल्ली अव्वल क्रमांकावर आणि मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता या दोन्ही संघांचे साखळी फेरीतील अखेरचा सामना बाकी आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवून अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी आतुर असतील.
तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी मात्र सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स या संघात मोठी स्पर्धा आहे. तसेच गुजरात जायंट्स देखील या शर्यतीत आहेत, पण त्यांची प्लेऑफमध्ये पोहचण्याची आशा खूपच धुसर आहे. गुजरातने 6 पैकी फक्त 1 सामना जिंकला असल्याने ते अखेरच्या क्रमांकावर आहेत.
तसेच सध्या तिसऱ्या क्रमांकावर बेंगलोर आहे. त्यांनी 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर असलेल्या युपी वॉरियर्सनेही 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता तिसरा क्रमांकावर स्थान पक्के करण्यासाठी या दोन्ही संघांना एकमेकांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
युपी वॉरियर्स त्यांचा अखेरचा साखळी सामना गुजरात जायंट्सविरुद्ध सोमवारी (11 मार्च) खेळणार आहे. या सामन्यात जर युपी वॉरियर्सने विजय मिळवला, तर त्यांचे 8 गुण होतील. तसेच ते तिसऱ्या क्रमांकावर येतील.
परंतु, प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी त्यांना मंगळवारी (12 मार्च) होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. बेंगलोरने जर या सामन्यात पराभव स्विकारला, तर युपी गुणांच्या आधारावर थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
पण, जर बेंगलोरनेही या सामन्यात विजय मिळवला, तर मात्र ज्या संघाचा नेटरन रेट चांगला असेल, तो संघ तिसरा क्रमांक मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
तसेच युपी प्रमाणे बेंगलोरचेही समीकरण आहे. बेंगलोरला आशा असेल की सोमवारी युपी संघाचा पराभव व्हावा, ज्यामुळे त्यांचा मार्ग सुखकर होईल. जर युपी संघ पराभूत झाला आणि बेंगलोरने मुंबईविरुद्ध मंगळवारी विजय मिळवला, तर बेंगलोर संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल.
याशिवाय, जर युपी आणि बेंगलोर हे दोन्ही संघ त्यांचे अखेरचे साखळी सामने पराभूत झाले, तरी मग नेट रन रेटवर तिसरा क्रमांक कोण मिळवणार हे अवलंबून राहिल.
तसेच युपी आणि बेंगलोर हे दोन्ही संघ पराभूत झाले, तर गुजरातचीही आशा जिवंत राहिल. पण त्यासाठी गुजरातला अखेरचे दोन्ही साखळी सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. मात्र, युपी किंवा बेंगलोर पैकी एकाही संघाने विजय मिळवल्यास गुजरातचे आव्हान संपुष्टात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.