Deandra Dottin: भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धा (WPL) सुरू असतानाच वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीनने खळबळजनक दावा केला आहे. तिला डब्ल्यूपीएल स्पर्धेसाठी गुजरात जायंट्स संघाने 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ती स्पर्धेतून बाहेर पडली. आता तिने तिच्या संघातून बाहेर होण्याचे कारण गोंधळून टाकणारे असल्याचे सांगितले आहे.
ती वैद्यकिय कारणामुळे स्पर्धेतून बाहेर झाली असल्याचे आधी सांगण्यात आले होते. नंतर गुजरात संघाकडून स्पष्ट करण्यात आले की ती अंतिम मुदतीपूर्वी वैद्यकिय मंजूरी मिळवू शकली नाही. त्यामुळे तिच्या जागेवर गुजरातने ऑस्ट्रेलियाच्या किम गार्थशी करार केला.
पण आता याबद्दल डॉटीनने खळबळजनक दावा करताना ट्विटरवर लिहिले आहे की 'पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमधून माझ्या बाहेर जाण्याबद्दल जी कारणे सांगितली जात आहेत, त्याबद्दल मी माझे स्पष्टीकरण देत आहे. मला स्पर्धेतून वगळण्यामागे ज्याप्रकारे तर्क लावून कारणे दिली गेली, त्याने मी निराश झाले आहे.'
'मला डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्सने खरेदी केले होते, ज्याचे अदानी ग्रुप मालक आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रँचायझीने असा दावा केला की मला संघातून बाहेर करण्यात आले कारण मी माझ्या वैद्यकीय परिस्थितीतून सावरत होते. यानंतर एक स्पष्टीकरण देण्यात आले, ज्यामध्ये असे म्हटले होते की मी वैद्यकीय मंजुरी मिळवू शकले नाही. पण सत्य हे आहे की मला 20 फेब्रुवारीला मंजूरी मिळाली होती.'
तिने पुढे म्हटले आहे की 'मला हे स्पष्ट करायचे आहे की माझ्या पोटात वेदना होत होत्या आणि सुजही होती, ज्यावर मी डिसेंबर 2022 मध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर मी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तज्ञांकडून सेंकड ओपिनियन घेतले होते. त्यानंतर झालेल्या तपासणीनंतर मला 13 फेब्रुवारीपर्यंत विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर 14 फेब्रुवारीपासून मला पुन्हा फिटनेसकडे वळण्यासाठी आणि खेळण्यासाठी मंजूरी मिळाली होती.'
'मी माझे वैयक्तिक ट्रेनिंग आणि तंदुरुस्तीकडे लक्ष देणे नियम आणि वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू केले. पुन्हा सुरू केलेल्या ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी काही वेदना जाणवल्या, जे अपेक्षित होते, कारण मला ट्रेनिंगच्या आधीच्या आठवड्यात विश्रांती घेण्यास सांगितले होते.'
डॉटीनने असेही सांगितले की तिच्या बोलण्याचा चूकीचा अर्थ गुजरात जायंट्सकडून घेण्यात आला. तिने लिहिले आहे की 'मी गुजरात जायंट्सच्या फिजिओथेरपिस्टला सर्व काही खरेखुरे सांगितले होते. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि नंतर संघ व्यवस्थापनला सांगण्यात आले की मला सराव सत्रानंतर पोटदुखी जाणवत आहे. जे की मी सूचित केले नव्हते.'
'मला 20 फेब्रुवारीला माझ्यावर उपचार करणार्या सर्जन, डॉ. लॅन लुईस यांनी वैद्यकीय मंजुरी दिली होती, ज्याचे कागदपत्रही मी गुजराज जायंट्सकडे सुपूर्त केले होते, पण तरीही त्यांनी मला कॅनडामध्ये तपासणी करण्यास सांगितले.'
डॉटीन वेस्ट इंडिजची दिग्गज खेळाडू असून तिने आत्तापर्यंत १४३ वनडे सामने खेळले असून 3727 धावा केल्या आहेत, तसेच 71 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तिने 127 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून 2697 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 62 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.