WPL 2023: युपीनं करून दाखवलं! मुंबई इंडियन्सला पहिल्यांदाच दिला पराभवाचा धक्का

MI vs UPW: शनिवारी वूमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करणारा युपी वॉरियर्स पहिला संघ ठरला आहे.
UP Warriorz
UP WarriorzDainik Gomantak

Mumbai Indians vs UP Warriorz: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी 15 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह युपी वॉरियर्सने प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

मात्र, मुंबईला या स्पर्धेतील पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई आणि युपीचा हा स्पर्धेतील प्रत्येकी सहावा सामना होता. मुंबईने पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला होता.

त्यामुळे मुंबई सध्या पहिल्या पराभवानंतरही गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच त्यांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. युपी सध्या 6 सामन्यांतील 3 विजय आणि 3 पराभवासह 6 गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबईने युपीसमोर विजयासाठी 128 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग युपीने 19.3 षटकात 5 विकेट्स गमावत 129 धावा करून पूर्ण केले.

UP Warriorz
WPL 2023: 'चिकनी चमेली'वर जेमिमाह रोड्रिग्जसह थिरकले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू, Video Viral

या सामन्यात 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 27 धावातच सुरुवातीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांच्यात 44 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी झाली. त्यामुळे युपीच्या डावाला स्थिरता मिळाली.

पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच ताहलियाला एमिलिया केरने 38 धावांवर बाद केलं. पण त्यानंतर हॅरिसने आक्रमक खेळ केला. तिला दुसऱ्या बाजूने दीप्ती शर्माने संयमी साथ दिली होती. पण हॅरिसची विकेटही केरने घेत युपीला धक्का दिला होता. हॅरिसने 39 धावांची खेळी केली. ती बाद झाली तेव्हा 26 चेंडूत 23 धावांची युपीला गरज होती. या धावा दीप्ती आणि सोफी एक्लेस्टोनने संयमाने खेळत पूर्ण केल्या.

शेवटच्या षटकात 5 धावाची गरज असताना पहिले दोन चेंडू इजी वाँगने निर्धाव टाकले होते. पण तिसऱ्या चेंडूवर एक्लेस्टोनने षटकार ठोकत युपीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दीप्ती 13 आणि एक्लेस्टोन 16 धावांवर नाबाद राहिल्या. मुंबईकडून केरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच नतालिया स्किव्हर, हेली मॅथ्यूज आणि इजी वाँग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

UP Warriorz
WPL 2023: गोविंदाच्या गाण्याची परदेशी महिला क्रिकेटपटूंनाही भूरळ, UPW खेळाडूंचा स्वॅग Video Viral

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटीया यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला 30 धावांची भागीदारीही केली. पण यस्तिकाला 7 धावांवर असताना अंजली सारवानीने त्रिफळाचीत केले. त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

मुंबईकडून मॅथ्यूज (35), हरमनप्रीत कौर (25) आणि इजी वाँग (32) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली अन्य सात फलंदाज एक आकडी धावसंख्येवरच बाद झाल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकात सर्वबाद 127 धावाच केल्या.

युपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर अंजील सारवाणीने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com