Dean Elgar claimed that Virat Kohli spat at him during Test match and apologised two years later:
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे काही वर्षांपूर्वी अनेकदा मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता यातच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सलामीवीर डीन एल्गारने विराटबद्दलची एक जुनी आठवण सांगत खळबळजनक दावा केला आहे.
एल्गारने सांगितले आहे की एकदा कसोटी सामन्यादरम्यान विराट त्याच्यावर थुंकला होता. पण नंतर दोन वर्षांनी त्याने त्याबद्दल माफी मागितली. त्यांच्यात एबी डिविलियर्सनेही मध्यस्थी केली होती.
एल्गार नुकताच या वर्षीच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने अखेरचा सामनाही भारताविरुद्ध केपटाऊनला खेळला.
दरम्यान नुकतेच माजी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस आणि रग्बी खेळाडू जीन डिविलियर्स यांच्याबरोबर बँटर विथ द बॉईज या पॉडकास्टमध्ये एल्गारने या घटनेबद्दल खुसाला केला आहे.
एल्गारने ही घटना कधीची आहे, याबद्दल सांगितले नसले, तरी त्याने दिलेले संदर्भ लक्षात घेता ही घटना २०१५ साली दक्षिण आफ्रिकेने केलेल्या भारत दौऱ्यादरम्यानची असल्याची शक्यता आहे.
एल्गारने सांगितले 'भारतात... त्या खेळपट्ट्या कठीण होत्या. मी जेव्हा फलंदाजीला गेलो होतो, तेव्हा मी खरंतर अश्विन आणि त्याचं नाव काय, ज,ज,जडेजा (मागून कोणीतरी जडेजा म्हटले) यांच्याविरुद्ध स्वत:ला वाचवत असल्याचे वाटत होते. त्यातच कोहली, तो माझ्यावर थुंकला.'
एल्गारने सांगितले की विराटच्या त्या कृतीनंतर त्याने त्याला शिवीगाळ केली. तसेच विराटला म्हटला की 'जर तू असं करणार असशील कर मी तुला उद्ध्वस्त करेल.'
यावेळी पॉडकास्ट होस्टने विचारले की तुला त्याला दिलेली शिवी त्याला कळाली का? त्यावर एल्गार म्हणाला, 'हो, त्याला कळालं कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये एबी डिविलियर्स त्याचा संघसहकारी होता.'
तसेच एल्गारने सांगितले की या घटनेबद्दल एबी डिविलियर्सला कळाले, तेव्हा त्याने विराट कोहलीशी चर्चा केली.
एल्गारने सांगितले, "जेव्हा डिविलियर्सला कळालं कोहलीने काय केले, तेव्हा तो त्याच्याकडे गेला आणि त्याने विचारलं तू माझ्या संघसहकाऱ्यावर का थुंकला?' यानंतर दोन वर्षांनी कोहलीने दक्षिण आफ्रिकेत आलेला असताना मला कॉल केला आणि म्हणाला, 'चालू मालिकेनंतर आपण ड्रिंक घ्यायला जाऊ. मला माझ्या कृतीबद्दल माफी मागायची आहे."
"दोन वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत त्याने जे केले त्याबद्दल त्याला माफी मागायची होती. त्यावेळी आम्ही ड्रिंकसाठी गेलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यावेळी पहाटे ३ वाजेपर्यंत ड्रिंक केले. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा कोहली ड्रिंक घ्यायचा, पण नक्कीच आता तो बदलला आहे."
याशिवाय जेव्हा एल्गारला विराट आणि अश्विनसारख्या खेळाडूंचा समावेश असेलल्या भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या अखेरच्या सामन्याबद्दल कसा अनुभव होता. त्यावर एल्गार म्हणाला, 'शानदार'.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भूतकाळात जरी एल्गार आणि विराट यांच्यात वाद झाले असले, तरी आता त्यांच्यात चांगले संबंध आहेत.
एल्गारच्या अखेरच्या कसोटीत विराटने त्याचा झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशनही नव्हते केले. तसेच त्याने संघातील इतर खेळाडूंनाही सेलिब्रेटन न करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर सामन्यानंतर विराटने एल्गारला त्याची कसोटी जर्सीही स्वाक्षरी करून भेट दिली होती.
एल्गारने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 86 कसोटी सामन्यात 37.92 च्या सरासरीने 5347 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.