Virat Kohli Bows Down to Dean Elgar after a catch as he played last Test Inning at Cape Town:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (4 जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. केपटाऊमधील न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून पहिल्याच दिवशी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आपल्या कृतीने करोडो लोकांची मनं जिंकली आहेत.
झाले असे की पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपुष्टात आले. त्यामुळे दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. दुसऱ्या डावात डीन एल्गार आणि एडेन मार्करम यांनी सुरुवात चांगली केली होती.
मात्र, एल्गारच्या रुपात 11 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला. एल्गार दुसऱ्या डावातही 28 चेंडूत 12 धावांवर बाद झाला. त्याला 11 व्या षटकात मुकेश कुमारने बाद केले. त्याचा झेल विराट कोहलीने पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना घेतला.
एल्गारची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरची खेळी ठरली. कारण या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
दरम्यान, त्याला बाद केल्यानंतर मुकेशने या विकेटचे सेलिब्रेशन केले. मात्र, त्याचवेळी झेल घेतलेल्या विराटने लगेचच सेलिब्रेशन न करता एल्गारला मान द्या, अशा अर्थाचे हातवारे केले, कारण एल्गार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरची खेळी करून परत चालला होता.
त्यानंतर लगेचच मुकेशने एल्गारची भेट घेतली. त्याबरोबर भारतीय संघातील अन्य खेळाडूंनीही एल्गारचे कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले. विराटनेही एल्गारचे अभिनंदन करताना त्याची गळाभेट घेतली. या घटनेचा व्हिडिओ कसोटी मालिकेचे प्रसारक स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
केपटाऊनमध्ये चालू असलेल्या कसोटीत पहिल्याच दिवशी तब्बल 23 विकेट्स गेल्या. प्रथम फलंदाजीला उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचाही पहिला डाव 153 धावांवर संपुष्टात आला. पण भारताने 98 धावांची आघाडी घेतली.
भारताचाही पहिला डाव पहिल्याच दिवशी संपल्याने दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावातही फलंदाजीला उतरली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 17 षटकात 3 बाद 62 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.