CSK Captain MS Dhoni reacted on long hair style:
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लाईफस्टाईलबद्दलही सातत्याने चर्चा होत राहते. अशीच गेल्या काही दिवसात त्याच्या लांब केसांच्या स्टाईलबद्दल सातत्याने चर्चा झाली आहे. आता खुद्द धोनीनेच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून धोनी नेहमीच वेगवेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसला आहे. पण, ज्यावेळी तो भारताकडून सुरुवातीला खेळायचा तेव्हा त्याची लांब केसांची स्टाईल बरीच प्रसिद्ध झाली होती. पण धोनीने 2007 टी२० वर्ल्डकपनंतर त्याचे लांब केस कापले.
त्यानंतर तो लांब केसांच्या स्टाईलमध्ये दिसला नव्हता. मात्र मागील काही दिवसात तो त्याचे केस वाढवताना दिसला आहे. त्याचे लांब केसांच्या नव्या हटके हेअरस्टाईलमधील अनेक फोटो प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिमनेही शेअर केले होते. हे फोटो प्रचंड व्हायरलही झाले होते.
दरम्यान, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो एका कार्यक्रमाचा असून त्यात धोनी त्याच्या लांब केसांच्या नव्या स्टाईलबद्दल भाष्य करत आहे.
धोनी म्हणाला, 'ही हेअरस्टाईल सांभाळणे खूप कठीण आहे. यापूर्वी, मी 20 मिनिटांमध्ये शुटसाठी वैगरे तयार व्हायचो. पण आता मला जवळपास 1 तास 5-10 मिनिटे लागतात.'
'मी ही हेअरस्टाईल सध्या ठेवली आहे, कारण माझ्या चाहत्यांना ती आवडली. पण जेवढे शक्य आहे, तितक्या दिवस मी ठेवेल. मात्र, एखाद्या दिवशी झोपून उठल्यावर मला त्याचा कंटाळा आला, तर मी ते कापून टाकेल.'
धोनीने तीन वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. दरम्यान धोनी 2023 आयपीएल हंगामात अखेरचे खेळेल, असे अनेकांनी अंदाज व्यक्त केले होते. मात्र धोनीने तो 2024 हंगाम खेळणार असल्याचे म्हटले होते.
तसेच चेन्नई सुपर किंग्सने या हंगामासाठी त्याला संघात कायम केल्याने तो आयपीएलच्या 17 व्या हंगामात खेळेल, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धोनी या हंगामात नेतृत्वपद कायम करणार आहे की नाही, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.