Cristiano Ronaldo Angry: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियातील अल-नासर क्लबकडून खेळत आहे. दरम्यान, सौदी प्रो लीगमध्ये गुरुवारी अल-नासरचा सामना अल इत्तिहाद संघाविरुद्ध झाला. या सामन्यात अल-नासरला अल-इत्तिहादने 1-0 अशा गोलफरकाने पराभूत केले. पण या पराभवानंतर रोनाल्डो चांगलाच चिडलेला दिसला.
रोनाल्डो अल-नासर संघात सहभागी झाल्यापासून या संघाचा हा पहिलाच पराभव होता. किंग अब्दुल्लाह स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अल-नासरकडून एकाही खेळाडूलाही गोल करता आला नाही. अल-इत्तिहादकडून रोमारिन्होने सामन्याच्या 80 व्या मिनिटाला एकमेव गोल करता आला.
दरम्यान, हा सामना पराभूत झाल्यानंतर रोनाल्डो प्रचंड निराश झाला होता. त्यातच रोनाल्डो सामन्यानंतर मैदानातून बाहेर जात असताना काही प्रेक्षक 'मेस्सी-मेस्सी' असा उद्घोष करत होते. त्यादरम्यान रोनाल्डोचा राग अनावर झाला आणि त्याने मैदानातून बाहेर जात असताना त्याच्या मार्गातील पाण्याच्या बॉटल्स जोरात लाथडल्या आणि रागात तो बाहेर पडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जातात. तसेच ते एकाच काळात खेळत असल्याने अनेकदा त्यांची तुलनाही केली जाते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोनाल्डोने काही वेळानंतर चाहत्यांना संदेश देणारे एक ट्वीटही केले. 5 वेळच्या बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने ट्वीट केले की 'जो निकाल लागला त्याने निराश झालो आहे. पण आम्ही या हंगामावर आणि आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. अल-नासरच्या चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आम्हाला माहित आहे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो.'
रोनाल्डोने आत्तापर्यंत अल-नासर संघाकडून 5 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2 हॅट्रिकसह एकूण 8 गोल केले आहेत. दरम्यान, अल-नासर संघाला त्यांचा पुढील सामना आभा क्लबविरुद्ध खेळायचा आहे. हा किंग्स कपचा उपांत्य-पूर्व सामना असेल. हा सामना मंगळवारी 14 मार्च रोजी होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.