Cheteshwar Pujara Hits century: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. 12 जुलैपासून कसोटी मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या कसोटी मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार अशा नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी मिळाली असली, तरी चेतेश्वर पुजारा, उमेश यादव अशा अनुभवी खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यातील खराब कामगिरीनंतर वगळण्यात आले आहे.
पण, यानंतरु पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र, त्याची दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. भारतीय संघातून वगळले गेल्यानंतर पुजारा सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभागाकडून खेळत आहेत.
त्याने अलुरला मध्य विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून शुक्रवारी (7 जुलै) शतक झळकावले आहे. त्याने दुसऱ्या डावात मध्य विभागाच्या गोलंदाजांविरुद्ध पूर्ण वर्चस्व ठेवत हे शतक केले. या शतकादरम्यान पुजाराने सूर्यकुमार यादवबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, सूर्यकुमार 52 धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. त्यानंतर मात्र पश्चिम विभागाची फलंदाजी गडगडली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर कोणाही पुजाराला भक्कम साथ देऊ शकले नाही. अखेर पुजाराही 9 व्या विकेटच्या रुपात बाद झाला. पुजाराने 278 चेंडूत 133 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला.
पुजाराच्या शतकाच्या आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 93.2 षटकात सर्वबाद 297 धावा केल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात पश्चिम विभागाने 92.5 षटकात सर्वबाद 220 धावा केल्या होत्या.
पहिल्या डावात मात्र पुजारा 28 धावांवर आणि सूर्यकुमार 7 धावांवर बाद झाले होते. पण पहिल्या डावात अतित शेठने महत्त्वपूर्ण 74 धावांची खेळी केली होती. तसेच मध्य विभागाने पहिल्या डावात सर्वबाद केवळ 128 धावा केल्या. त्यामुळे पश्चिम विभागाने 92 धावांची मोठी आघाडी घेतली.
दरम्यान, पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 60 वे शतक ठरले आहे. त्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 60 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा पाचवाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विजय हजारेंची बरोबरी केली आहे. त्यांनीही 60 प्रथम श्रेणी शतके केली आहेत. तसेच अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर प्रत्येकी 81 शतकांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ 68 शतकांसह राहुल द्रविड आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.