Sunil Gavaskar slams selectors for dropping Cheteshwar Pujara from India's Test squad:
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (23 जून) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. पण यावर सुनील गावसकरांनी नाराजी व्यक्त केली.
भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी पुजाराला भारतीय संघातील वरच्या फळीतील फलंदाजीच्या अपयशासाठी बळीचा बकरा का बनवले गेले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान पार पडलेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी भारताची वरची फळी मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरली होती.
याबद्दल स्पोर्ट्स टूडेशी बोलताना गावसकर म्हणाले, 'त्याला (पुजाराला) का वगळण्यात आले. आपल्या फलंदाजीतील अपयशासाठी त्याला बळीचा बकरा का बनवण्यात आले. तो भारतीय क्रिकेटचा प्रामाणिक सेवक आहे. प्रामाणिक आणि शांत सेवक. पण जर त्याला संघातून बाहेर केल्यानंतर प्रश्न विचारणारे त्याचे माध्यमांमध्ये लाखो चाहते नाहीत, म्हणून तुम्ही त्याला वगळले. हे समजण्यापलिकडचे आहे.'
याबरोबरच संघ घोषित करताना कोणतीही पत्रकार परिषद निवड समितीकडून घेतली गेली नसल्याकडेही गावसकरांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, 'त्याला वगळण्यासाठी आणि बाकी जे अपयशी ठरले, त्यांना कायम करण्यासाठी काय निकष लावण्यात आले? मला माहित नाही कारण आजकाल निवड समिती अध्यक्षांचा मीडियाशी संवाद होत नाही.'
याशिवाय गावसकरांनी असेही म्हटले की केवळ वयाच्या आधारावर पुजाराला वगळणेही चूकीचे आहे. त्याचबरोबर पुजारा कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरलेला एकटा फलंदाज नव्हता. या सामन्यात केवळ अजिंक्य रहाणेने अपेक्षाभंग केला नव्हता.
भारताचे माजी कर्णधार गावसकर म्हणाले, 'तो काउंटी क्रिकेटही खेळतो. त्यामुळे तो लाल चेंडूचे क्रिकेट (प्रथम श्रेणी क्रिकेट) भरपूर खेळतो आणि त्याला त्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आजकाल खेळाडू 39 - 40 वर्षापर्यंत आणि जोपर्यंत धावा होत आहेत तोपर्यंत खेळतात. मला वाटत नाही की वय हे कारण ठरावे.'
'रहाणेशिवाय फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. मग पुजाराला बळीचा बकरा का बनवण्यात आले, याचे स्पष्टीकरण निवडकर्त्यांना द्यावे लागणार आहे.'
कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात फलंदाजांमध्ये केवळ अजिंक्य राहणेने 50 धावांचा आकडा पार केला होता. त्याने 89 धावांची खेळी केली होती. तसेच त्याच्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजा (48) आणि शार्दुल ठाकूर (51) यांनी चांगले योगदान दिले होते. मात्र, याव्यतिरिक्त प्रमुख फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते.
तसेच दुसऱ्या डावात कोणत्याच भारतीय फलंदाजाला 50 धावांचा आकडा पार करता आला नव्हता. दुसऱ्या डावात विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या, तर रहाणेने 46 धावांची खेळी केली होती.
दरम्यान 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पहिल्यांदाच यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. जयस्वालला पुजाराच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते, अशी चर्चाही सध्या होत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.