BCCI secretary Jay Shah presented Golden Ticket to Sachin Tendulkar for ICC ODI Cricket World Cup 2023:
भारतात 5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही 13 वी वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) गोल्डन तिकिट देण्यात आले आहे.
बीसीसीआने सोशल मीडियावर सचिनला गोल्डन तिकिट प्रदान करण्याबद्दल माहिती दिली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सचिव जय शाह सचिनला गोल्डन तिकीट देत असल्याचे दिसत आहे.
'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' कार्यक्रमाचा भाग म्हणून एका खास प्रेझेंटेशन दरम्यान सचिनला हे तिकिट देण्यात आले.
याबद्दल बीसीसीआयने ट्वीट केले की 'क्रिकेट आणि देशासाठी एक शानदार क्षण! 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' कार्यक्रमाचा भाग म्हणून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकरला गोल्डन तिकीट प्रदान केले.'
'क्रिकेटमधील निपुनतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या प्रवासाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. आता तो आयसीसी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा लाईव्ह पाहाण्याचा भाग असेल.'
यापूर्वी बीसीसीआयने भारताचे दिग्गज जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही गोल्डन तिकीट प्रदान केले आहे.
दरम्यान, हा 13 वा वनडे वर्ल्डकप असला तरी पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपचे यजमानपद स्वतंत्रपणे भारताकडे आहे. यापूर्वी भारतात 1987, 1996 आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचे सामने झाले होते. पण त्यावेळी भारत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह संयुक्त यजमान होते. पण यंदा केवळ भारतीय संघाकडे यजमानपद आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. या 10 संघात मिळून 10 सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील 48 सामने असे मिळून एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या ठिकाणी रंगणार आहेत. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने सुरुवात होईल. 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
मुख्य स्पर्धेतील सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत.
त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे उपांत्य सामने होती.
या वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे, तसेच उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.