BCCI Announced India A Women Team for Emerging Women's Asia Cup: हाँग काँगमध्ये 12 जूनपासून उदयोन्मुख महिला आशिया चषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय महिला अ संघाची घोषणा केली आहे. या संघात 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे याचवर्षाच्या सुरुवातीला 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघातील श्वेता सेहरावतकडे उदयोन्मुख महिला आशिया चषकासाठी (Emerging Women's Asia Cup) भारतीय अ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच सौम्या तिवारीकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
श्वेताने भारताला 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तिने 7 सामन्यांमध्ये 99 च्या सरासरीने 297 धावा केल्या होत्या. यामध्ये ती ३ सामन्यांत नाबाद राहिली होती. तसेच अष्टपैलू सौम्याने 4 सामन्यांमध्ये 84 धावा केल्या होत्या, तिने इंग्लंडविरुद्ध केलेली 24 धावांची खेळी भारताला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरली होती.
याशिवाय 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील पार्शवी चोप्रा, तितास साधू, मन्नत कश्यप, एस यशश्री यांनाही उदयोन्मुख महिला आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.
उदयोन्मुख महिला आशिया चषक यंदा पहिल्यांदाच खेळला जात असून या स्पर्धत ८ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे.
भारतीय अ संघाचा समावेश ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतासह हाँग काँग, पाकिस्तान अ आणि थायलंड अ या महिला संघांचा समावेश आहे. तसेच ग्रुप बी मध्ये बांगलादेश अ, मलेशिया, श्रीलंका अ आणि युएई हे चार महिला संघ आहेत.
या दोन्ही गटात अव्वल स्थानी राहणारे प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या दोन संघात 21 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
साखळी फेरीत भारतीय संघ पहिला सामना 13 जून रोजी हाँग काँग विरुद्ध खेळेल, त्यानंतर दुसरा सामना 15 जूनला थायलंड अ संघाविरुद्ध खेळेल. तसेच भारतीय अ संघाचा पाकिस्तान अ संघाविरुद्ध 17 जून रोजी सामना होणार आहे.
श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी (उपकर्णधार), तृषा गोंगडी, मुस्कान मलिक, श्रेयंका पाटील, कनिका अहुजा, उमे छेत्री (यष्टीरक्षक), ममता मदीवाला (यष्टीरक्षक), तितास साधू, एस यशश्री, काशवी गौतम, पार्शवी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.