Bangladesh won by 6 wickets against Afghanistan in 3rd Match of ICC ODI Cricket World Cup 2023:
वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळवण्यात आला. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता.
या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने ३४.४ षटकात ४ विकेट्स गमावून १५८ धावा करत पूर्ण केला. या सामन्यात बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ३ विकेट्स घेत आणि अर्धशतक झळकावत अष्टपैलू कामगिरी केली.
अफगाणिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी सलामीवीर तान्झिद हसन(५) आणि लिटन दास (१३) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या.
पण, त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि नजमुल हुसैन शांतो यांनी अर्धशतके करत बांगलादेशचा डाव सांभाळला. मात्र, अर्धशतकानंतर मेहदी हसन मिराज ५७ धावांवर बाद झाला. मात्र नजमुल शांतोने बांगलादेशला विजयापर्यंत नेले. त्याला कर्णधार शाकिब अल हसनने साथही दिली होती. शाकिबने १४ धावा केल्या. नजमुल शांतो ५९ धावांवर नाबाद राहिला.
अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी चांगली सुरुवात केली होती. पण झाद्रान २२ धावांवर बाद झाला.
त्यानंतर रेहमन शाह आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी हे देखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकले नाहीत. दोघेही प्रत्येकी १८ धावा करून बाद झाले. त्यानंतर गुरबाजही ४७ धावा करून बाद झाला. यानंतर मात्र केवळ अझमतुल्लाह ओमरझाईलाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्याने २२ धावा केल्या. अखेर अफगाणिस्तान संघ ३७.२ षटकात १५६ धावांवर सर्वाबाद झाला.
बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच शोरिफुल इस्लामने २ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमद आणि मुस्तफिझुर रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.