

क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. डार्विनमधील TIO स्टेडियमवर झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर तब्बल 9 विकेट्सने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामन्यात कांगारूंना हरवण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे.
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव फार काळ टिकू दिला नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 198 धावांवर आटोपला. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
बांगलादेशकडून हसन महमूदने जबरदस्त गोलंदाजी करत तब्बल सहा फलंदाजांना बाद केले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
पहिल्या डावात बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला केला. तंझीद हसनने शानदार शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेले. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर मेहदी हसन मिराजने 65 धावांचे योगदान दिले.
या फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात तब्बल 426 धावा उभारल्या. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियावर तब्बल 228 धावांची मोठी आघाडी मिळाली. सामन्यावर बांगलादेशची पकड याच टप्प्यावर मजबूत झाली होती.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तुलनेने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. कॅमेरून ग्रीनने शतक झळकावत संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर स्टीव्ह स्मिथने 44 धावांचे योगदान दिले.
मात्र पहिल्या डावातील मोठी पिछाडी ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरली. त्यांचा दुसरा डाव 284 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी केवळ 57 धावांचे लक्ष्य उरले.
लहान लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने कोणतीही घाई केली नाही. अर्ध्या तासात कांगारूंचा गेम केला. त्यांनी केवळ एक विकेट गमावत 57 धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना आपल्या नावावर केला. अशाप्रकारे बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत इतिहास रचला.
दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. हसन महमूदने तीन विकेट्स घेतल्या, तर मेहदी हसन मिराजने पाच फलंदाजांना माघारी धाडले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा हा एकूण दुसरा विजय ठरला. यापूर्वी 2017 मध्ये मीरपूर येथे झालेल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्या सामन्यात बांगलादेशने 20 धावांनी विजय मिळवला होता.
मात्र डार्विनमधील विजयाचे महत्त्व यापेक्षा मोठे आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारूंना कसोटीत पराभूत करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा विजय बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.