Tamim Iqbal ruled out of Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असतानाच बांगलादेश क्रिकेट संघाला तगडा झटका लागला आहे.
बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू तमिम इक्बालने वनडे कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्याने त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषकातूनही नाव मागे घेतले आहे.
तमिम नुकताच इंग्लंडहून त्याच्या पाठीवर उपचार करून आला आहे. त्याने तिथे बरेच इंजेक्शनही घेतले आहेत. तो सध्या पूर्ण विश्रांतीवर असून त्याला पुढील आठवड्यापर्यंत तरी रिहॅबला (दुखापतीनंतर पुनरागमनासाठीची प्रक्रिया) सुरुवात करता येणार नाही.
त्याला आगामी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी बांगलादेशने पुरेशी विश्रांती देण्याचा निर्णय घेतलेला असून शकतो.
दरम्यान, 6 जुलै रोजी चितगाव येथे पत्रकार परिषदेत तमिमने निवृत्ती घोषित केली होती. पण नंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्याने हा निर्णय दुसऱ्याच दिवशी मागे घेतला.
तमिमने भविष्याचा विचार करून कर्णधारपद सोडल्याचे सांगितले. त्याने सांगितले की त्याने याबद्दल शेख हसिना यांच्याही चर्चा केली. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन आणि जलाल युनूस यांच्याशीही चर्चा केली.
तमिम म्हणाला, 'मला वाटते दुखापत ही समस्या आहे. मी इंजेक्शन घेतले होते. पण त्याचा उपयोग झाला तर झाला किंवा नाही, असे होते. मी बोर्डाला या समस्येबद्दल सांगितले आहे. मी नेहमीच संघाला सर्व गोष्टी बाजूला सारुन मदत केली आहे.'
'त्यामुळे हे लक्षात घेऊन कर्णधारपद सोडणे हाच सर्वोत्तम निर्णय होता. पुढे जेव्हाही संधी मिळेल तेव्हा एक खेळाडू म्हणून मी माझे सर्वोत्तम देईल. मी पंतप्रधानांशी बोललो आहे आणि त्यांनी मला समजून घेतले आहे.'
आता तमिम सप्टेंबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी तयारी करेल. दरम्यान, वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करण्याची तमिमला आशा आहे. तसेच त्याला भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही खेळण्याची आशा आहे.
दरम्यान, तमिमने वनडे वर्ल्डकप सोडल्यानंतर लिटन दासला बांगलादेशचे वनडे कर्णधारपद मिळण्याची शक्यता दाट आहे.
34 वर्षीय तमिमने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर तो बांगलादेशकडून अखेरचा कसोटी सामना एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला आहे. तमिम बांगलादेशच्या उत्तर वनडे कर्णधारांपैकी एक मानला जातो.
त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने 37 वनडे सामन्यांपैकी 21 सामने जिंकले आहेत. त्याने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटीत नेतृत्वही केले होते.
तमिमने 241 वनडे सामन्यांत 14 शतके आणि 56 अर्धशतकांसह 36.62 च्या सरासरीने 8313 धावा केल्या आहेत. तो वनडेत बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.