पणजी : केरळा ब्लास्टर्सला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत पुन्हा विजयी सूर गवसला. त्यांनी शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 2-1 फरकाने हरविले. विशेष बाब म्हणजे, शेवटची वीस मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही त्यांनी विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.
वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झालेल्या या लढतीतील सर्व गोल उत्तरार्धात झाले. अर्जेंटिनाचा जॉर्जे परेरा डायझ याने शानदार हेडिंगवर लक्ष्य साधले. मोसमातील वैयक्तिक चौथा गोल नोंदवत त्याने 62व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. केरळच्या संघाचा एक खेळाडू 70व्या मिनिटास कमी झाला. आयुष अधिकारी याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.
त्यानंतर 82व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू अल्वारो वाझकेझ याने प्रेक्षणीय गोलद्वारे केरळा ब्लास्टर्सची आघाडी वाढविली. मध्यक्षेत्रापासून चेंडूवर ताबा राखत मुसंडी मारलेल्या वाझकेझ याचा हा मोसमातील पाचवा गोल ठरला. भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास महंमद इर्शाद याच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडला पिछाडी कमी केल्याचे समाधान लाभले.
सलग दहा सामने अपराजित राहिल्यानंतर मागील लढतीत बंगळूरकडून हार पत्करलेल्या केरळा ब्लास्टर्सला हा एकंदरीत सहावा विजय ठरला. त्यांचे आता 13 लढतीनंतर 23 गुण झाले आहे. अग्रस्थानावरील हैदराबाद एफसीपेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत. हैदराबादचा संघ एक सामना जास्त खेळला आहे. नॉर्थईस्ट युनायटेडला स्पर्धेत नामुष्काली सामोरे जावे लागले. सर्वाधिक 10 पराभव आणि सर्वांत जास्त 35 गोल स्वीकारण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. 16 लढतीनंतर गुवाहाटीच्या संघाचे 10 गुण आणि शेवटच्या अकराव्या क्रमांकात फरक पडलेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.