

Babar Azam Strike Rate Controversy PSL: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये आपल्या बॅटिंगपेक्षा संथ स्ट्राइक रेटमुळे अधिक चर्चेत आहे. पेशावर जाल्मी संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबरने मुल्तान सुल्तानविरुद्धच्या विजयानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपली बाजू मांडताना चक्क संताप व्यक्त केला. आधुनिक टी-20 क्रिकेटमध्ये जिथे फलंदाज पहिल्या चेंडूपासून चौकार-षटकारांची आतिषबाजी करतात, तिथे बाबरचा संथ खेळ संघासाठी डोकेदुखी ठरत असल्याची टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना बाबरने 'तोंड उचलून शॉट मारता येत नाहीत' अशा शब्दांत आपला बचाव केला.
बाबर आझमने (Babar Azam) आपल्या फलंदाजीचे समर्थन करताना सांगितले की, "प्रत्येक दिवशी खेळपट्टी सारखी नसते. ज्या खेळपट्टीवर आम्ही 240 धावा केल्या, तिथे दुसऱ्या दिवशी 180 धावा करणेही कठीण झाले होते. परिस्थिती आणि क्रमांकावर सर्व काही अवलंबून असते. लोक स्ट्राइक रेटबद्दल बोलतात, पण मैदानावर गेल्यावर तुम्ही फक्त तोंड उचलून शॉट मारु शकत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि प्रत्येक दिवशी वेगळ्या गेम प्लॅनसह उतरावे लागते." बाबरने आपल्या संथ फलंदाजीला परिस्थितीचा दोष दिला असला तरी, क्रिकेट विश्वात त्याच्या या विधानाची खिल्ली उडवली जात आहे.
आकडेवारीवर नजर टाकली तर बाबर आझमची अडचण स्पष्टपणे दिसून येते. या हंगामातील 5 सामन्यांत त्याने 57.57 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत, जो आकडा दिसायला चांगला आहे. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट अवघा 130.68 चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 9 फलंदाजांच्या यादीत बाबरचा स्ट्राइक रेट सर्वात कमी आहे. जेव्हा इतर खेळाडू 150-160 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटत आहेत, तेव्हा बाबरचा हा संथ वेग टी-20 फॉरमॅटला साजेसा नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियातील 'बिग बॅश' लीगमध्येही बाबर आझमच्या संथ फलंदाजीमुळे त्याची मोठी नाचक्की झाली होती. बदलत्या काळात क्रिकेट अधिक आक्रमक झाले असून, केवळ सरासरी चांगली ठेवून उपयोग नाही, तर संघाला वेगाने धावांची गरज असते. मात्र, बाबर अद्यापही जुन्या धाटणीच्या क्रिकेटलाच प्राधान्य देताना दिसत आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) या स्टार खेळाडूला जर जागतिक स्तरावर आपली प्रतिमा टिकवायची असेल, तर केवळ बचावात्मक विधाने न करता मैदानावर आपल्या बॅटिंगचा अंदाज बदलावा लागेल, असे आता क्रीडा वर्तुळात बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.