Australia Won WTC 2023 Final against India: कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने जिंकले. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया आता कसोटी विश्वविजेतेही झाले आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्या डावात 63.3 षटकात सर्वबाद 234 धावा करता आल्या.
दरम्यान, सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.
या सामन्यात अखेरच्या दिवशी विजयासाठी भारताला 280 धावांची गरज होती, तर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज होती. पण ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. अखेरच्या दिवशी भारताने 41 षटके आणि 3 बाद 164 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी विराटने 44 धावांपासून आणि रहाणेने 20 धावांपासून खेळायला सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या दिवशीही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला.
मात्र 47 व्या षटकात स्कॉट बोलंडने भारताला दुहेरी धक्के दिले. त्याने तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला आणि पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजाला चूक करण्यात भाग पाडले. विराटचा ४९ धावांवर अप्रतिम झेल स्लीपमध्ये स्टिव्ह स्मिथने घेतला. तसेच जडेजाचा शुन्यावरच असताना यष्टीरक्षरक ऍलेक्स कॅरीने झेल घेतला.
त्यानंतर श्रीकर भरतने रहाणेला साथ देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच रहाणेला 57 व्या षटकात मिचेल स्टार्कने बाद केले. त्याचाही झेल ऍलेक्स कॅरीने घेतला. त्याने 46 धावांची खेळी केली.
त्यानंतर मात्र भारतीय फलंदाजी कोसळली. त्यानंतर पुढील 7 षटकात भारताने शार्दुल ठाकूर (0), उमेश यादव (1), श्रीकर भरत (23) आणि मोहम्मद सिराज (1) यांच्या विकेट्स घेतल्या.
त्याआधी दुसऱ्या डावात भारताने चौथ्या दिवशी शुभमन गिल (18), रोहित शर्मा (43) आणि चेतेश्वर पुजारा (27) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच स्कॉट बोलंडने 3 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स आणि कर्णधार पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी या सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून ऑस्ट्र्लियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.