Meg Lanning: दक्षिण अफ्रिकेमध्ये नुकताच महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात आला. या वर्ल्डकपमधील अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध यजमान दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघात पार पडला. केपटाऊनला झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी विजय मिळवत सहाव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
ऑस्ट्रेलियन महिला संघाने आत्तापर्यंत 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि 2023 अशा सहा वर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे. यातील 2014, 2018, 2020 आणि 2023 वर्षी मिळवलेली विजेतीपदे त्यांनी मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत.
खरंतर मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियन महिला संघ सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यांनी वनडे आणि टी20 अशा दोन्ही क्रिकेट प्रकारात आपले वर्चस्व राखले आहे. त्यामुळे ती फक्त ऑस्ट्रेलियाचीच नाही, तर जगातील यशस्वी क्रिकेट कर्णधार ठरली आहे.
तिच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला संघाने 2022 साली झालेला वनडे वर्ल्डकपही जिंकला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून आता तिने एकूण 5 आयसीसी विजेतीपदे जिंकण्याचा कारनामा केला आहे. याचमुळे ती सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारी कर्णधारही ठरली आहे. तिने याबाबतीत रिकी पाँटिंग आणि एमएस धोनीलाही मागे टाकले आहे.
पाँटिंगने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 4 आयसीसी विजेतीपदे नावावर केली आहेत. त्याने कर्णधार म्हणून 2003 व 2007 वनडे वर्ल्डकप आणि 2006 व 2009 चॅम्पियन्स ट्रॉफी ही विजेतीपदे जिंकली आहेत.
तसेच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी ही तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.
मेग लेनिंगची कर्णधार म्हणून कामगिरी
पाच आयसीसी विजेतीपदे नावावर केलेल्या मेग लेनिंगने 78 वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 69 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 8 सामन्यांत पराभव स्विकारला असून 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
तसेच 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व करताना 76 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून 18 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला असून 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
इतकेच नाही, तर तिने 4 कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यातील 1 सामना जिंकला असून 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्यावर्षी तिच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रकुल स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.