Australia, India and Shubman Gill fined by ICC: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 209 धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलिया कसोटीतील नवा जगज्जेता संघ ठरला. दरम्यान, या सामन्यानंतर आता सोमवारी आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसह भारताचा सलामीवर शुभमन गिलवरही कारवाई केली आहे.
कारवाईबद्दल आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचे सर्व सामना शुल्क (match fees) कापले जाईल, तसेच ऑस्ट्रेलियाचे 80 टक्के सामना शुल्क कापले जाईल. यामागे दोन्ही संघांनी षटकांची गती न राखल्याचे कारण आयसीसीने दिले आहे.
भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके उशीरा टाकली, तर ऑस्ट्रेलियाने 4 षटके उशीरा टाकली.
आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार संघाने निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी खेळाडूंच्या सामना शुल्कात 20 टक्के कपात केली जाते. याच नियमानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूच्या सामना शुल्कात कपात करण्यात आली आहे.
याशिवाय शुभमन गिलवरही सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात त्याला बाद देण्याच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती.
त्याचमुळे त्याला आयसीसीने कलम 2.7 चे उल्लंघन केल्याने फटकारले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात घडणाऱ्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणी करण्याच्या संबंधित आहे.
दरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंवर आधीच आयसीसीने सामना शुल्काच्या 100 टक्के दंड लावल्याने आता गिलवर 115 टक्क्यांचा एकूण दंड लागला आहे. त्यामुळे आता त्याला त्याच्या शिक्षेचा भाग म्हणून त्याला पैसे भरावे लागणार आहेत.
झाले असे की चौथ्या दिवशी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. पण 8 व्या षटकात स्कॉट बोलंडने गिलला 18 धावांवर बाद केले. त्याचा कॅमेरॉन ग्रीनने गलीच्या क्षेत्रात झेल घेतला.
पण हा झेल ग्रीनने चेंडू खूप खाली झेलला होता. त्यामुळे चेंडू जमीनीवर लागला आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण तिसऱ्या पंच रिचर्ड केटलबोरो यांनी ग्रीनचा झेल योग्य ठरवत गिलला बाद दिल्याने त्याला 18 धावांवर माघारी परतावे लागले.
त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पंचांच्या निर्णयावर गिलने सोशल मीडिया पोस्टमधून नाराजी व्यक्त केली होती. गिलने ग्रीन झेल घेत असतानाचा फोटो शेअर करताना भिंगाचे इमोजी कॅप्शनमध्ये टाकले होते.
गिलने केलेल्या याच चूकीमुळे आता त्याला आयसीसीकडून कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्या डावात 63.3 षटकात सर्वबाद 234 धावा करता आल्या. यामुळे भारताचे पुन्हा एकदा कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले.
यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.