World Cup 2003 Final: भारताविरुद्ध शतक ठोकताना पाँटिंगने ड्रेसिंग रुमला काय पाठवलेला मेजेस? वाचा इनसाईड स्टोरी

India vs Australia: रिकी पाँटिंगने 2003 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताविरुद्ध 140 धावांची नाबाद खेळी करताना त्याच्या संघसहकाऱ्यांसाठी खास संदेश पाठवला होता.
Ricky Ponting
Ricky PontingICC
Published on
Updated on

Australia Captain Ricky Ponting message to teammates during century against India in Cricket World Cup 2003 Final:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना रंगणार आहे.

त्यामुळे 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी 2003 साली या दोन संघात वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला होता.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक कर्णधार रिकी पाँटिंग ठरला होता. त्याने तडाखेबंद शतकी खेळी केली होती. दरम्यान, ही खेळी करण्यापूर्वी त्याने एक खास संदेश ड्रेसिंग रुममध्ये पाठवला होता. या इनसाईड स्टोरीचा त्यानेच cricket.com.au. सोबत बोलताना तीन वर्षांपूर्वी खुलासा केला होता.

Ricky Ponting
World Cup 2023: शानदार शमी! सेमी-फायनलमध्ये 7 विकेटस घेत 'या' 7 रेकॉर्ड्सलाही घातली गवसणी

ऑस्ट्रेलियाचा विजय

त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियानेही हे आमंत्रण स्विकारत त्याचा फायदा उचलला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजी आलेल्या ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांनी शतकी भागीदारी केली.

गिलख्रिस्टने 57 धावा केल्या, तर हेडन 37 धावांवर बाद झाला. या दोघांना हरभजनने 20 षटकांच्या आत बाद केले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 125 धावा झाल्या होत्या. पण त्यानंतर रिकी पाँटिंग आणि डॅमिएन मार्टिनची जोडी जमली. त्यावेळी त्यांच्यात 234 धावांची नाबाद भागीदारी झाली होती.

पाँटिंगने 121 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 140 धावांची खेळी केली. मार्टिनने 84 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 88 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 2 बाद 359 धावा केल्या होत्या.

Ricky Ponting
World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनल खेळणार, पण मार्शने IPL दरम्यान केलेली 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

पाँटिंगचा संदेश

दरम्यान, फलंदाजीला उतरल्यानंतर त्यावेळीचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने ड्रेसिंग रुममध्ये तो जोखीम घेऊन आक्रमक फलंदाजी करणार आहे, त्यामुळे सर्व गोष्टींसाठी तयार राहा असा संदेश पाठवला होता. त्यानंतर त्याने भारतीय गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध हल्लोबोल केला होता.

त्याने सांगितले होते, 'दुसरा ड्रिंक्सब्रेक झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स गेलेल्या होत्या आणि डावातील 15 षटकांचा खेळ बाकी होता. मी 12 व्या खेळाडूला सांगितले की आत खेळाडूंना सांग की तयार राहा. मी आता लगेचच आक्रमक खेळायला सुरुवात करणार आहे.'

'जर मी यशस्वी झालो, तर आपल्याला मोठी धावसंख्या उभारता येईल. ज्याप्रकारे फलंदाजी होत होती ते पाहून त्या भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर केवळ 300 धावा उभारण्यात मी खूश नव्हतो. जर मी आत्ता आक्रमक खेळलो, तर आपण मोठी धावसंख्या उभारू.'

तसेच त्याने सांगितले होते की 'मला माझ्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंवर विश्वास होता. अद्याप डॅरेन लेहमन, मायकल बेवन आणि अँड्र्यू सायमंड्स येणे बाकी होते.'

Ricky Ponting
World Cup: सेमी-फायनल, 213 धावा अन् हार्टब्रेक! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्यात इतिहासाची पुनरावृत्ती

दुखापत असतानाही मार्टिनची खेळी

तसेच पाँटिंगने मार्टिनला बोटाची दुखापत असतानाही खेळण्यासाठी कसे विचारले होते, याबद्दलही सांगितले होते. मार्टिनला बोटाची दुखापत असतानाही तो अंतिम सामना खेळला होता.

पाँटिंगने सांगितले होते, 'सामन्याआधी मी त्याला म्हटले होते की माझ्या डोळ्यात पाहून सांग की तू खेळायला तयार आहेस की नाही. त्यानंतर त्याने हो म्हटले होते. मला मार्टिन या वर्ल्डकपमध्ये खेळायला हवा होता, तो खूप चांगला खेळाडू होता, विशेषत: फिरकी गोलंदाजीच्या विरुद्ध तो चांगला खेळाडू होता.'

दरम्यान, त्या सामन्यात 360 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 39.2 षटकातच 234 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून विरेंद्र सेहवागने सर्वाधिक 82 धावा केल्या होत्या, तर राहुल द्रविडने 47 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅकग्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com