डेव्हिड वॉर्नरने या वर्षी त्याच्या मायदेशात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेट तसेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तथापि, त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही आणि तो या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि या सामन्यात त्याचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. वॉर्नरची फलंदाजी पाहता तो 37 वर्षांचा आहे असे वाटले नाही. वॉर्नरने शानदार खेळी करत आपला 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना अतिशय संस्मरणीय बनवला.
दरम्यान, या सामन्यात वॉर्नरने केवळ 22 चेंडूत एक षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने वेगवान फलंदाजी सुरु ठेवली. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी मिळाली. पहिल्या डावात जोश इंग्लिश वॉर्नरसोबत ओपनिंगसाठी आला आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात वॉर्नरने 36 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली.
दुसरीकडे, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने (David Warner) अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या 100 व्या सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले, तर 100व्या एकदिवसीय सामन्यात त्याने शतक झळकावले, तर 100व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला आणि यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला. डेव्हिड वॉर्नरपूर्वी हा विक्रम एकाही कांगारु फलंदाजाच्या नावावर नव्हता.
जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. वॉर्नरच्या आधी, विराट कोहली आणि रॉस टेलर हे दोनच खेळाडू आहेत ज्यांनी आपापल्या देशांसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.
विराट कोहली (भारत)
रॉस टेलर (न्यूझीलंड)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार राहिली आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 100 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये वॉर्नरने 112 कसोटीत 8786 धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने 161 एकदिवसीय सामन्यात 6932 धावा आणि टी20 मध्ये 2964 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 176 आयपीएल सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 6397 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, वॉर्नरने त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून टी-20 क्रिकेट खेळणे सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले होते. वॉर्नर 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर वॉर्नर या फॉरमॅटला अलविदा करु शकतो, असेही मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.