

Tilak Varma on IND A vs SL A Semifinal Match: आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये 'इंडिया अ' संघाचा प्रवास संपला असून, श्रीलंकेने 8 विकेट्सनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. भारताने (India) 317 धावांचा मोठा डोंगर उभारुनही श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शतके झळकावत हा सामना सहज जिंकला. या पराभवानंतर कर्णधार तिलक वर्मा चांगलाच निराश दिसला. आम्ही सुरुवातीला बनवलेल्या प्लॅननुसार खेळलो नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले.
सामन्यानंतर बोलताना तिलकने श्रीलंकेच्या खेळाचे कौतुक केले. दोन्ही सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केली आणि या विजयाचे श्रेय त्यांनाच जाते, असे तो म्हणाला. सर्व गोलंदाजांना वापरुनही यश आले नाही आणि आमचा दिवसही खराब होता, असे त्याने नमूद केले. पहिल्या 15 षटकांत प्रतिषटक 6 किंवा त्यापेक्षा कमी धावा रोखण्याचा आमचा बेत होता, कारण नंतर खेळपट्टी संथ होते; पण आम्ही त्यात अपयशी ठरलो, असे त्याने सांगितले.
फलंदाजीबद्दल बोलताना तिलकने समाधान व्यक्त केले, मात्र गोलंदाजीत सुधारणा गरजेची असल्याचे त्याने ठामपणे सांगितले. 20 षटकांनंतर खेळपट्टी मंदावली आणि मध्येच सलग 3 विकेट्स गेल्याने आमचे नुकसान झाले, पण आम्ही सावरलो, असे तो म्हणाला. आमची फलंदाजी चांगली झाली, परंतु गोलंदाजीच्या आघाडीवर ड्रेसिंग रुममध्ये आणि मायदेशी जाऊन गंभीर विचार करावा लागेल, असा इशारा त्याने दिला.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 8 बाद 317 धावा केल्या. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शाहबाज अहमद यांनी अर्धशतके झळकावली, तर वैभव सूर्यवंशीने 40 धावांची भर घातली. 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या लसिथ क्रूसपुलेने 107 चेंडूंत 116 आणि सिनेथ जयवर्धनेने 70 चेंडूंत 105 धावांची शतकी खेळी खेळली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 174 धावांची भक्कम भागीदारी करत संघाचा विजय पक्का केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.