Ashes 2023, England vs Australia, 1st test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबॅस्टनला पार पडला होता. या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 92.3 षटकात 2 विकेट्स राखून पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून 9 व्या विकेटसाठी कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी महत्त्वपूर्ण नाबाद 55 धावांची भागीदारी केली.
कमिन्सने 93 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनविरुद्ध चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटीत 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिंकलेल्या अखेरच्या दोन सामन्यात कमिन्सच्या बॅटमधूनच विजयी धाव साकारली गेली.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यापूर्वी अखेरच्या वेळी 250 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग नोव्हेंबर 2011 मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी सामन्यात केला होता.
विशेष म्हणजे या सामन्यातूनच पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यानंतर तब्बल 12 वर्षांनी कमिन्स कर्णधार झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कसोटीत 250 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
दरम्यान, एजबॅस्टनला झालेल्या पहिल्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजानेही शानदार 65 धावांची खेळी करत विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्याच दिवशी 8 बाद 393 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडकडून जो रुटने 118 धावांची खेळी केली होती. तसेच जॉनी बेअरस्टोने 78 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 141 धावांची खेळी केली. याशिवाय ऍलेक्स कॅरीने 66 धावांची आणि ट्रेविस हेडने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ड ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात इंग्लंडने सर्वबाद 273 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावातील 7 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. या दोघांनाही प्रत्येकी 46 धावा केल्या.
तसेच कर्णधार बेन स्टोक्सने 43 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच स्कॉट बोलंड आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.