Ashes History: क्रिकेटमधील काही स्पर्धा अंत्यत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या मानल्या जातात. त्यातीलच एक मालिका म्हणजे ऍशेस. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला ऍशेस म्हटले जाते. या मालिकेत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाची बाजी लावताना दिसतात.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसाठी ही मालिका इतकी प्रतिष्ठेची का आहे? या मालिकेचा इतिहास काय आणि या कसोटी मालिकेला ऍशेस असं नाव पडलं तरी का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नांच्या उत्तरांचा घेतलेला हा आढावा.
तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला तब्बल 141 वर्षांचा इतिहास आहे. झाले असे की 29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लंडचा संघ मायदेशात पहिल्यांदा द ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पराभूत झाला होता. त्यामुळे इंग्लंड चाहते चांगलेच नाराज झाले होते.
तसेच इंग्लंडच्या या पराभवानंतर 'स्पोर्टिंग टाइम्स'या एका इंग्लिश वृत्तपत्रानं 'इंग्लिश क्रिकेटचे निधन' हे शीर्षक देताना चक्क शोक संदेश लिहिला होता. स्पोटिंग टाईम्सच्या या शोक संदेशात लिहिलं होतं की '29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लिश क्रिकेटचे निधन झाले असून अंत्यसंस्कारानंतर राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल.' इथूनच क्रिकेटमध्ये ऍशेस हा शब्द आला (राखेलाच इंग्लिशमध्ये ऍशेस असं म्हटलं जातं).
त्यानंतर काही आठवड्यांनी ज्यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघाला, तेव्हा त्यावेळीचा इंग्लंडचा कर्णधार इवो ब्लिंगने राख परत आणण्याची शपथ घेतली. तसेच ऑस्ट्रेलियन कर्णधार डब्ल्यूएल मर्डोचने ती राख आम्ही राखू असं म्हटलं.
त्यानंतर इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली. त्याचवेळी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका सामन्यानंतर फ्लोरेन्स मॉर्फी या महिलने तिच्या मैत्रिणींसह तिच्या एका परफ्युम जारमध्ये स्टंपवरील बेल्स जाळल्यानंतरची राख भरून इंग्लंडच्या कर्णधाराला भेट म्हणून दिली. ज्याला आज ऍशेस अर्न (ऍशेस कप) म्हणून ओळखले जाते. ज्या ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ एकमेकांशी दोन हात करतात.
विशेष म्हणजे 1984 साली ब्लिंगने फ्लोरेन्सशी ऑस्ट्रेलियात लग्नही केले. दरम्यान, ब्लिंग त्या अर्नला त्याचे वैयक्तिक भेट मानत होता, त्यामुळे अनेकवर्ष तो कप त्याच्या घरी होता. पण ब्लिंगच्या निधनानंतर फ्लोरेन्सने त्याच्या इच्छेखातर लॉर्ड्स मैदनाला तो अर्न दिला. जो सध्या लॉर्ड्सच्या संग्रहालयात आहे.
ज्यावेळी ऍशेल मालिका असते, त्यावेळी विजेत्या संघाला या ट्रॉफीची केवळ प्रतिकृती दिली जाते.
आत्तापर्यंत 72 ऍशेस मालिका खेळवण्यात आले असून 34 मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत आणि 32 मालिका इंग्लंडने जिंकल्या आहेत. त्याचबरोबर 6 मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
16 - 20 जून - पहिली कसोटी - एजबस्टन
28 जून - 2 जुलै - दुसरी कसोटी - लॉर्ड्स
6 - 10 जुलै - तिसरी कसोटी - हेडिंग्ले
19 - 23 जुलै - चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफोर्ड
27 - 31 जुलै - पाचवी कसोटी - द ओव्हल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.