England Captain Ben Stokes Fielding Setup: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेला 16 जूनपासून बर्मिंगघममध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यातच दोन्ही संघात विजयासाठी चूरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने केलेल्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेने सर्वांचेच लक्ष वेधले.
या सामन्यात स्टोक्सचे नेतृत्व पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्याने पहिल्या दिवशीच 78 षटकांनंतर इंग्लंडचा पहिला डाव 8 बाद 393 धावांवर धावांवर घोषित केला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ आणि शतकवीर उस्मान ख्वाजाविरुद्ध लावलेले अनोखे क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय ठरले.
स्टोक्सने स्मिथला मागच्या बाजूने आणि ख्वाजाविरुद्ध पुढच्या बाजूने घेरणारे क्षेत्ररक्षण लावले होते. ज्यामुळे स्मिथ आणि ख्वाजा दोघेही शॉट खेळताना गडबडलेले दिसले, परिणामी त्यांनी विकेटही गमावली.
स्टीव्ह स्मिथला स्वत: स्टोक्सने 27 व्या सामन्यात 16 धावांवर बाद केले. स्मिथला रोखण्यासाठी स्टोक्सने मागील बाजूस तीन स्लीपमध्ये, एक गलीमध्ये, दोन लेग स्लीप आणि एक शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक लावले होते. त्यामुळे स्मिथ बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात स्टोक्सविरुद्ध पायचीत झाला.
त्यानंतर स्टोक्सने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केलेल्या ख्वाजाविरुद्धही क्षेत्ररक्षणाचे शस्त्र वापरले. त्याने ख्वाजाविरुद्ध 3 ऑफ साईडला आणि 3 लेग साईडला क्षेत्ररक्षक लावले होते, ज्यामुळे त्याला एकेरी-दुहेरी धावा करणे कठीण गेले. परिणामी ख्वाजा ऑली रॉबिन्सनविरुद्ध 141 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाव्यतिरिक्त ऍलेक्स कॅरीने 66 धावांची आणि ट्रेविस हेडने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 286 धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ड ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी 8 बाद 393 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडकडून जो रुटने 118 धावांची खेळी केली होती. तसेच जॉनी बेअरस्टोने 78 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 28 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे सध्या इंग्लंडकडे 35 धावांची आघाडी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.