Angelo Mathews set to take place of Injured Matheesha Pathirana in Sri Lanka squad for ICC ODI Cricket World Cup 2023 :
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा मध्यावर आलेली असतानाच श्रीलंका मात्र खेळाडूंच्या दुखापतीने चिंतेत आहे. आता त्यांचा नियमित कर्णधार दसून शनकानंतर 20 वर्षीय वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना देखील या स्पर्धेतून बाहेर झाल्याचे समजत आहे.
मीडियातील रिपोर्ट्सनुसार आणि श्रीलंकेचे समालोचक रोशन अबेसिंघे यांनी केलेल्या पोस्ट नुसार श्रीलंका क्रिकेटने दुखापतग्रस्त पाथिरानाच्या जागेवर माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्युजचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. दरम्यान, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
पाथिरानाला 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स संघाविरुद्ध सामने खेळला नाही. पण आता तो स्पर्धेतूनही बाहेर झाला आहे.
पाथिरानाचा हा पहिलाच वर्ल्डकप आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोनच संघाविरुद्ध सामने खेळले आहेत. मात्र त्याला त्याची फारशी छाप पाडला आलेली नाही. यात त्याला दोनच विकेट्स घेता आल्या.
पाथिरानाने यंदा आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सकडून प्रभावित करणारी कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, श्रीलंकेकडे पाथिरानाच्या जागेवर वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिराला घेण्याचाही पर्याय होता. पण त्यांनी आधी मॅथ्युजला पसंती दिली आहे. मॅथ्युजने आत्तापर्यंत 106 कसोटी, 221 वनडे आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 180 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत श्रीलंका संघर्ष करताना दिसत आहेत. त्यांना आत्तापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत, तर 1 सामना पराभूत झाला आहे. श्रीलंका सध्या 22 सामन्यांनंतर गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.