पणजी : गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू अमेय अवदी याने दमदार चाली रचत पुन्हा एकदा छाप पाडली. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने दहा फेऱ्यांतून सात गुणांची कमाई केली.
स्पर्धेच्या शेवटच्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे अमेयला ‘पोडियम’ हुकले. मोसमातील चमकदार फॉर्म कायम राखताना अमेयने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिगरबाज खेळ केला. या स्पर्धेत त्याला सतरावे मानांकन होते.
एकंदरीत त्याने पाच डाव जिंकले, तर चार डाव बरोबरीत राखले. स्पर्धेच्या आठव्या फेरीपर्यंत तो संयुक्त आघाडीवर होता. शेवटच्या फेरीत त्याला उझबेकिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर ओर्तिक निग्मातोव याच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे अंतिम क्रमवारीतील टायब्रेकरमध्ये स्थान घसरले.
स्पर्धेत एकूण जगभरातील 146 खेळाडूंनी भाग घेतला, त्यात 42 खेळाडू किताबधारक होते. रशियन ग्रँडमास्टर बोरिस सावचेन्को याने साडेआठ गुणांसह विजेतेपद मिळविले.
बलाढ्य खेळाडूंना नमविले
अमेय अवदीने विशाखापट्टमणमधील स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी नोंदविताना बलाढ्य खेळाडूंना नमविले. त्याने अमेरिकन ग्रँडमास्टर रासेट झियात्दिनोव याला, तर भारतीय ग्रँडमास्टर मित्रभा गुहा यांना पराजित केले.
स्पर्धेतील अव्वल मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनातोव याला बरोबरीत रोखले. फारुख याने भारतात लागोपाठ दोन स्पर्धा जिंकताना विशाखापट्टणममधील स्पर्धेपूर्वी भुवनेश्वर व पुणे येथील स्पर्धेत बाजी मारली होती.
अमेयने भारतीय इंटरनॅशनल मास्टर हिमल गुसेन, उझबेकिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर ओर्तिक निग्मातोव यांच्याविरुद्ध बरोबरीचा अर्धा गुण मिळविला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.