IPL 2023 प्लेऑफसाठी चूरस वाढली! 10 टीमपैकी कोणाचं पारडं जड? असे आहे समीकरण

आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सध्या सर्व 10 संघांना संधी आहे, पण त्यांच्यासमोर कशी आव्हाने आहेत, याचा घेतलेला आढावा...
IPL 2023 Play off equation
IPL 2023 Play off equationDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 Play off equation: इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम सध्या सुरू आहे. या हंगामात जवळपास रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. कधी फलंदाजांचे, तर कधी गोलंदाजांचे वर्चस्व सामन्यांमध्ये दिसते. त्यातच आता आयपीएलच्या या हंगामाचा अंतिम टप्पा सुरू झाला असल्याने संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चूरस आहे.

या हंगामात आत्तापर्यंत 52 सामने खेळून पूर्ण झाले आहेत, तर 18 सामने बाकी आहेत. पण या 52 सामन्यांनंतरही सर्व 10 संघांचे आव्हान कायम आहे. 52 सामन्यांनंतर गुणतालिका पाहिली तर गुजरात जायंट्स आघाडीवर असून त्यांनी 11 सामन्यांमधील 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. त्यांनी 11 सामन्यांतील 6 सामने जिंकले आहेत, तसेच एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे त्यांचे 13 गुण आहे.

त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे 11 गुण आहेत. त्यांनी 11 सामन्यांमधील 5 सामने जिंकले आहेत, तर 1 सामना रद्द झाला आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स हे चारही संघांनी आत्तापर्यंत 5 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या फरकामुळे हे चारही संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

तसेच आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपटल्स हे संघ आहेत. या तिन्ही संघांनी आत्तापर्यंत 4 सामने जिंकले असून त्यांचे प्रत्येकी 8 गुण आहेत.

दरम्यान, सर्व 70 साखळी सामने पार पडल्यानंतर पहिल्या चार क्रमांकावर राहाणारे संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे अद्याप सर्व 10 संघांचे आव्हान कायम आहे. साखळी फेरीतील सर्व 70 सामने 21 मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने 23 ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना, 24 मे रोजी एलिमिनेटर आणि 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर चेन्नईमध्ये होणार आहे. तसेच दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादला खेळवला जाईल.

IPL 2023 Play off equation
IPL 2023 मध्ये तब्बल 10 देशांच्या खेळाडूंनी जिंकला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार, पाहा संपूर्ण लिस्ट
Gujarat Titans
Gujarat TitansDainik Gomantak

गुजरात टायटन्स -

सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सची कामगिरी दमदार झाली आहे. गतविजेत्या असलेल्या गुजरातने 11 सामन्यांमध्येच 8 विजय नोंदवले आहेत, तर त्यांना 3 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांनी त्यांच्या उर्वरित ३ साखळी सामन्यांमधील अजून एक जरी सामना जिंकला, तरी ते प्लेऑफमध्ये जागा पक्की करू शकतात. गुजरातचे अजून मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाविरुद्ध सामने बाकी आहेत.

Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak

चेन्नई सुपर किंग्स -

एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ पुन्हा एकदा प्लेऑफच्या दिशेने वेगाने आगेकुच करत असल्याचे दिसत आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई देखील प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहे आणि 4 पराभव स्विकारले आहेत. तसेच 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे 13 गुण आहेत.

अद्याप चेन्नईचे दिल्ली कॅपिटल्सबरोबर दोन आणि कोलकाता नाईट रायडर्स बरोबर एक असे एकूण तीन साखळी सामने बाकी आहेत. त्यामुळे चेन्नई जास्तीत जास्त 19 गुण मिळवू शकतात. पण जरी त्यांनी अजून दोन सामने जिंकले, तरी त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के होऊ शकते.

Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak

लखनऊ सुपर जायंट्स -

कर्णधार केएल राहुलच्या दुखापतीमुळे बाहेर जाण्याने लखनऊला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सध्या तिसऱ्या क्रमांकावर असले, तरी त्यांना अन्य संघांकडून तगडी स्पर्धा मिळू शकते. लखनऊने आत्तापर्यंत 11 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले आहे आणि 5 पराभव स्विकारले आहेत. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांचे 11 गुण आहेत.

त्यांना अजून सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत. त्यांनी हे तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के होऊ शकते. पण यातील एखादा सामना जरी ते पराभूत झाले, तरी त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबुन राहावे लागू शकते.

Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak

राजस्थान रॉयल्स -

सध्या गुणतालिकेत चौथे स्थान राजस्थानने कायम केले असले तरी त्यांच्यासाठी पुढील मार्ग सोपा राहिलेला नाही. त्यांना अन्य सर्वच संघांकडून स्पर्धा मिळत आहे. सुरुवात चांगली केलेल्या राजस्थानची कामगिरी गेल्या काही सामन्यांमध्ये खालावली असून त्यांनी नुकतेच सलग तीन पराभव देखील स्विकारले आहेत. राजस्थानने आत्तापर्यंत 11 सामन्यांमध्ये 5 सामने जिंकले असून 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 10 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त आता 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

त्यामुळे त्यांना त्यांच्या खालच्या क्रमांकावर असणाऱ्या संघांनी 16 गुणांपर्यंत पोहचू नये अशी अपेक्षा करावी लागणार आहे, तसेच उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यांचे अद्याप कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्सविरुद्ध सामने होणार आहेत.

IPL 2023 Play off equation
Virat Kohli in IPL: किंग कोहलीने फिफ्टी ठोकत घातला विक्रमांचा रतीब! IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच
RCB
RCBDainik Gomantak

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -

बेंगलोरची यंदाच्या हंगामातील कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यांनी 10 सामन्यांमध्ये 5 सामने जिंकले आहे, तर 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अद्याप 10 गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेटरनरेटही निगेटिव्ह आहे. तसेच त्यांना अद्याप 4 सामने खेळायचे आहेत, म्हणजेच ते 18 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

पण त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी या चार सामन्यांमधील आता कमीतकमी तीन विजय तरी मिळवावेच लागतील. याशिवाय त्यांना अन्य संघांच्या कामगिरीकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. बेंगलोरला अजून मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत. हे सामने जर बेंगलोरने जिंकले तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे मार्ग सहज खुले होऊ शकतात.

Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

मुंबई इंडियन्स -

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईचीही कामगिरी संमिश्रच झाली आहे. त्यांनीही बेंगलोरप्रमाणेच 10 सामन्यांमध्ये 5 सामने जिंकले आहे, तर 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अद्याप 10 गुण असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचाही नेटरनरेट निगेटिव्ह आहे. तसेच त्यांना अद्याप 4 सामने खेळायचे आहेत, म्हणजेच ते 18 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

ते देखील उर्वरित 4 सामन्यांमधील तीन सामने जिंकून प्लेऑफची दावेदारी ठोकू शकतात पण त्यासाठी त्यांना अन्य संघांच्या निकालांवरही अवलंबुन रहावे लागणार आहे. तसेच त्यांना उर्वरित 4 सामन्यांपैकी एक सामना बेंगलोरविरुद्धही खेळायचा आहे. त्यामुळे आता या सामन्यानंतर एक संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणखी जोर लावावा लागेल. मुंबईने अद्याप बेंगलोरव्यतिरिक्त गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध सामना खेळायचे आहेत.

Punjab Kings
Punjab KingsDainik Gomantak

पंजाब किंग्स -

आपल्या प्रत्येक सामन्यात शेवटपर्यंत लढणारा संघ म्हणून ओळख मिळवलेल्या पंजाबसाठीबी प्लेऑफचा मार्ग सोपा राहिलेला नाही. त्यांनीही मुंबई आणि बेंगलोर प्रमाणे 10 सामन्यांमध्ये 5 सामने जिंकले आहे, तर 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अद्याप 10 गुण आहेत, पण नेट रन रेट कमी असल्याने ते सातव्या क्रमांकावर आहेत.

तसेच त्यांना अद्याप 4 सामने खेळायचे आहेत, म्हणजेच ते 18 गुणांपर्यंत पोहचू शकतात. पण नेट रन रेटचा विचार करता त्यांना प्लेऑफसाठी या चारही सामन्यांमध्ये विजय जवळपास आवश्यक आहेत. असे न झाल्यास त्यांना अन्य संघ कशी कामगिरी करणार, त्यावर अवलंबुन राहावे लागणार आहे. त्यांना अद्याप दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत, तसेच कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्रत्येकी 1 सामने खेळायचा आहे.

Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersDainik Gomantak

कोलकाता नाईट रायडर्स -

यंदा नितीश राणाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने काही सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवला आहे. पण त्यांना 10 सामन्यांमधअये अद्याप 4 सामनेच जिंकता आले आहे, तर 6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ते 16 गुणांपर्यंतच पोहचू शकतात. त्यामुळे आता प्लेऑफपर्यंत जाण्यासाठी त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे, तर लागतीलच पण त्याचबरोबर त्यांच्या वरच्या क्रमांकावर असलेल्या सर्व संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणा आहे. कोलकाताला अद्याप पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

IPL 2023 Play off equation
IPL 2023: कॅच, नो-बॉल अन् मग सिक्स... हैदराबादने राजस्थानकडून हिरावला विजय, बटलरच्या 95 धावा व्यर्थ
Sunrisers Hyderabad
Sunrisers HyderabadDainik Gomantak

सनरायझर्स हैदराबाद -

सुरुवातीपासूनच संघर्ष करणाऱ्या हैदराबादसाठीही पुढचा प्रवास सोपा नाही. त्यांनीही कोलकाताप्रमाणे 10 सामन्यांमध्ये 4 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे. त्यामुळे ते 16 गुणांपर्यंतच पोहचू शकतात. तसेच प्लेऑफच्या शर्यतीत आता त्यांना कायम राहाण्यासाठी उर्वरित चारही सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे.

यातील एकही सामना पराभूत झाल्यास त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकते. तसेच त्यांना आता अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. हैदराबादला अद्याप लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

Delhi Capitals
Delhi Capitals Dainik Gomantak

दिल्ली कॅपिटल्स -

सुरुवातीलाच सलग 5 पराभवांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीने नंतरच्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि त्यांचे आव्हानही कायम ठेवले आहे. पण आता त्यांना प्लेऑफसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या उर्वरित चारही सामन्यांत विजय, तर आवश्यक आहेच, पण त्यांना अन्य संघांच्या निकालावरही अवलंबुन राहावे लागणार आहे. त्यांच्या उर्वरित साखळी सामन्यांमध्ये दोन सामने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहेत आणि दोन सामने पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com