

Akeal Hosein IPL 2026 Impact Player: "खेळाल तर नवाब व्हाल" ही म्हण वेस्ट इंडिजच्या अकिल हुसेनने 23 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः जगून दाखवली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने 103 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला, जो त्यांच्या 19 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. या विजयाचा खरा शिल्पकार संजू सॅमसन असला, तरी चेन्नईने 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मैदानात उतरवलेल्या अकिल हुसेनने केवळ 24 चेंडूत असा काही कहर केला की मुंबईचा अवघा टॉप ऑर्डर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.
तब्बल तीन वर्षांनंतर आयपीएलमध्ये (IPL) पुनरागमन करणाऱ्या अकिलने 4 षटकांत केवळ 17 धावा देऊन 4 बळी टिपले. विशेष म्हणजे, दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या 22 चेंडूत त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना एकही चौकार किंवा षटकार मारु दिला नाही. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांसारख्या दिग्गजांना बाद करत त्याने मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
अकिल हुसेनचा हा पराक्रम केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर तो एका भीषण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर मिळवलेला विजय आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील लैवंटिल या छोट्याशा गावात अकिलचा जन्म झाला. हे गाव गँगवॉर आणि गुन्हेगारी टोळ्यांसाठी कुप्रसिद्ध होते. अकिलचे बालपण बंदुकांच्या गोळ्यांच्या आवाजात आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या सावलीत गेले. अशा वातावरणात अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात, पण अकिलने मात्र आपल्या कुटुंबाला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी क्रिकेटची बॅट आणि चेंडू हातात धरला.
ज्या फातिमा स्कूलने जगाला ब्रायन लारासारखा महान खेळाडू दिला, त्याच शाळेविरुद्ध स्थानिक सामन्यात दमदार कामगिरी करुन अकिलने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्याच शाळेने अकिलला आपलेसे केले आणि तिथूनच त्याच्या नशिबाचे चक्र फिरले.
अकिलची लोकप्रियता लैवंटिलमध्ये इतकी वाढली की, स्थानिक टोळ्याही त्याला सन्मान देऊ लागल्या. त्याला गुन्हेगारी टोळ्यांचे संरक्षण मिळू लागले, पण त्याने स्वतःला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ दिले नाही. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आल्यावर त्याला सुनील नरेन आणि कायरन पोलार्ड यांसारख्या दिग्गज खेळाडूंची मोलाची साथ लाभली. आर्थिक मदतीपासून ते राहण्यापर्यंतच्या समस्यांत या खेळाडूंनी त्याला आधार दिला. याच जिद्दीच्या जोरावर अकीलने अंडर-19 वर्ल्ड कपमधून थेट वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. आज वानखेडेवर मुंबईविरुद्ध त्याने गाजवलेला पराक्रम ही केवळ एका सामन्याची आकडेवारी नसून प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन 'शून्यातून विश्व' निर्माण करणाऱ्या एका जिद्दी खेळाडूचा थरार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.