

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि मुकेश कुमार यांना बिहार सरकारकडून मोठा सन्मान मिळाला आहे. राज्य सरकारच्या 'मेडल लाओ, नौकरी पाओ' या योजनेअंतर्गत दोन्ही खेळाडूंची पोलिस उपअधीक्षक (DSP) पदावर नियुक्ती करण्यात आली. पटना येथे आयोजित विशेष कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत राज्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील प्रतिभांना सरकारी सेवेत संधी देण्याचा सरकारचा उपक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पटना येथील ऊर्जा ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमात केवळ आकाश दीप आणि मुकेश कुमारच नव्हे, तर एकूण 19 खेळाडूंना विविध सरकारी पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमात अॅथलेटिक्समधील पियुष राज यांची पोलिस उपनिरीक्षक (SI) पदावर नियुक्ती करण्यात आली. याशिवाय विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू आणि पॅरा-अॅथलीट्सनाही सरकारी सेवेत स्थान देण्यात आले. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी आणि क्रीडामंत्री श्रेयसी सिंहही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
बिहार सरकारने गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. सरकारच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांत 180 हून अधिक खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी देण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान निवडक खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीची प्रमाणपत्रे तसेच आर्थिक सन्मानही प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात अॅथलीट सेतु मिश्रा याचाही विशेष गौरव करण्यात आला. आशियाई अंडर-23 स्पर्धेत सुवर्णपदक आणि अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 37.50 लाख रुपयांची सन्मानरक्कम देण्यात आली.
तसेच अॅथलीट विभास्कर कुमार यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सहभागासाठी आर्थिक पुरस्कार देण्यात आला. राज्य सरकारने खेळाडूंना केवळ नोकरीच नव्हे, तर आर्थिक प्रोत्साहनही देण्यावर भर दिल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
सध्या आकाश दीप आणि मुकेश कुमार हे भारतीय संघाबाहेर आहेत. दुखापतीमुळे आकाश दीपला आयपीएल 2026 हंगामाला मुकावे लागले होते. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याच्या पुनरागमनाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, मुकेश कुमारने आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना अपेक्षित कामगिरी केली नसली, तरी आगामी स्पर्धांमध्ये दमदार प्रदर्शन करून पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.