Ajinkya Rahane: आयपीएलपूर्वी रहाणेने दाखवला दम! 26 चौकार अन् 3 षटकारांसह ठोकलं द्विशतक, Video

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकले आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत मुंबईकडून खेळताना कर्णधार अजिंक्य रहाणेने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळी केली आहे. या स्पर्धेत मुंबईचा दुसरा सामना मंगळवारपासून हैदराबादविरुद्ध शरद पवार क्रिकेट ऍकेडमी, मुंबई येथे सुरू आहे. या सामन्यात पहिल्याच डावात मुंबईच्या भक्कम फलंदाजीने वर्चस्व राखल्याचे दिसत आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत मुंबईने 124 षटकांत 5 बाद 636 धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबईकडून कर्णधार रहाणेने कर्णधारपदाला शोभेल अशी 261 चेंडूत 204 धावांची द्विशतकी खेळी केली आहे. त्याने या खेळीत 26 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याला तनय त्यागराजनने त्रिफळाचीत केले.

त्याच्याआधी यशस्वी जयस्वालने मुंबईकडून पहिल्याच डावात 162 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर पहिल्या दिवशी सूर्यकुमार यादवनेही 90 धावांची खेळी केली होती. तसेच आता दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर सर्फराज खान 123 धावांवर नाबाद खेळत आहे.

दरम्यान रहाणे आणि जयस्वाल यांच्यात 206 धावांची भागीदारी झाली होती. तसेच रहाणे आणि सर्फराज यांच्यात 196 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे मुंबईला 600 धावांचा टप्पा सहज पार करता आला आहे.

(Ajinkya Rahane scored Double Century before ipl auction 2023)

आयपीएल लिलावात रहाणे सहभागी

रहाणेने ही द्विशतकी खेळी करत आयपीएल संघांचेही लक्ष त्याच्याकडे वेधले आहे. 23 डिसेंबर रोजी आयपीएल 2023 साठी लिलाव होणार आहे. या लिलावात रहाणेही सहभागी आहे. त्याची मुळ किंमत 50 लाख असून आता त्याच्यावर कोणता संघ बोली लावणार हे पाहावे लागणार आहे.

रहाणे आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडूनकडून खेळला होता. पण केकेआरने त्याला आयपीएल 2023 आधी संघातून मुक्त केले. त्यामुळे रहाणे यंदा लिलावात दिसणार आहे.

Ajinkya Rahane
IPL 2023 Auction: आयपीएल लिलावात 'या' 3 स्पिनर्ससाठी सर्व फ्रँचायजी लावणार जोर...

भारतीय संघात परतण्याची आशा

दरम्यान, रहाणेला भारतीय संघात पुनरागमन करण्याचीही आशा असेल. तो जानेवारी 2022 पासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याचा खराब फॉर्म आणि दुखापती अशा कारणांमुळे त्याला भारतीय कसोटी संघातून बाहेर रहायला लागले आहे. सध्या सुरु असलेल्या भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठीही त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झालेली नाही.

त्यामुळे आता रहाणेला चालू रणजी ट्रॉफी हंगामात चांगली कामगिरी करून पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com