Aiden Markram World Record in ODI Cricket World Cup History during South Africa vs Sri Lanka match:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामना झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 428 धावांचा डोंगर उभारला. या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना एडेन मार्करमने नवा विश्वविक्रम केला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून आधी सलामीला फलंदाजीला आलेल्या क्विंटन डी कॉकने 84 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील रस्सी वॅन दर ड्यूसेनने 110 चेंडूत 108 धावा केल्या.
यानंतर चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या एडेन मार्करमने तुफानी खेळ करताना 54 चेंडूत 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकारांची बरसात केली. यादरम्यान, त्याने 49 चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले होते.
त्यामुळे त्याच्या नावावर वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रमाची नोंद झाली. त्याने हा विश्वविक्रम करताना २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये केविन ओ'ब्रायनने केलेला विक्रम मोडला आहे. केविन ओ'ब्रायनने बंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्ध 2011 मध्ये 50 चेंडूत शतक केले होते.
49 चेंडू - एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023)
50 चेंडू - केविन ओ'ब्रायन (आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, बंगळुरू, 2023)
51 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी, 2015)
52 चेंडू - एबी डीविलियर्स (दश्रिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2015)
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून शनिवारी डीकॉक, ड्यूसेन आणि मार्करम या तिघांनी शतक केल्याने आणखी एक विक्रम झाला आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये एकाच डावात तीन खेळाडूंनी शतक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही वनडे वर्ल्डकपमध्ये एकाच डावात ३ खेळाडूंनी शतक केलेले नाही.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे तीनदा वर्ल्डकरमध्ये 400 धावा पार करणारा दक्षिण आफ्रिका पहिला आणि सध्यातरी एकमेव संघ आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.