न्यूझीलंड वेगवान गोलंदाज नील वॅगनरने 27 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होत आहे.
हा फोटो दक्षिण आफ्रिकेतील एका शाळेच्या क्रिकेट संघाचा आहे. या फोटोत वॅगनरसह दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस दिसत आहेत.
खरंतर डिविलियर्स आणि डू प्लेसिस हे एकाच शाळेत शिकले असून लहापणापासूनचे मित्र असल्याचे अनेक क्रिकेटपटूंना माहित आहे. मात्र अनेकांना हे माहित नाही की डिविलियर्स आणि डू प्लेसिस यांच्यासह वॅगनरही एकाच शाळेत शिकला आहे.
हे तिघेही दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामधील आफ्रिकान्स होअर बॉईज सिउनस्कूल (आफ्रिकन्स बॉईज हायस्कूल) या शाळेत एकत्र होते. तसेच या शाळेच्या संघाकडून एकत्र खेळले आहेत. डिविलियर्स आणि डू प्लेसिस हे या शाळेतून 2002 साली उत्तीर्ण होऊन बाहेर पडले, तर वॅगनर 2004 साली या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडला.
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्येही याच शाळेचा क्रिकेट संघ आहे. या फोटोखाली संघातील खेळाडूंची नावेही दिसत असून त्याच डू प्लेसिस, डिविलियर्स आणि वॅगनर यांचेही नाव आहे.
विशेष म्हणजे डू प्लेसिस या शाळेच्या संघाचाही कर्णधार होता. डू प्लेसिस पहिल्या ओळीत बसला आहे, तर डिविलियर्स आणि वॅगनर दुसऱ्या ओळीत उभे आहेत. हा फोटो पृथ्वी नावाच्या युझरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, वॅगनर, डिविलियर्स आणि डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेमध्ये बरेच क्रिकेट खेळले. मात्र, वॅगनरला फारशी संधी मिळत नसल्याने त्याने न्यूझीलंडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याने काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर तो राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरला.
त्यानंतर त्याने 2012 साली न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तो गेली 12 वर्षे न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळला. तसेच डिविलियर्स आणि डू प्लेसिसने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले.
इतकेच नाही, तर त्यांना दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली. हे दोघेही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.