A Pilot's request to MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा केवळ भारतातीलच नाही, तर जगातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. त्याने आजपर्यंत मिळवलेल्या यशामुळे आज त्याने जगभरात एक वेगळीच ओळख मिळवली आहे.
त्याची लोकप्रियता अनेक घटनांमधून दिसून आली आहे. याचाच प्रत्येक देणारी एक घटना नुकतीच घडली. एका पायलेटने धोनीला एक खास विनंती केली असून त्याचा व्हिडिओही वाऱ्यासारखा सध्या व्हायरल होत आहे.
सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की यंदाचा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम आहे.
दरम्यान, आयपीएल सामन्यांच्या निमित्ताने धोनी सीएसके संघाबरोबर प्रवास करत असलेल्या एका विमानाच्या पायलेटने त्याच्याकडे खास विनंती केली. हा पायलेट धोनीचा चाहता असल्याचेही त्याने सांगितले.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की पायलेट लाउडस्पीकरवर सांगत आहे की त्याच्या फ्लाईटमधून सीएसकेचा संघ प्रवास करत असल्याने त्याला आनंद झाला आहे. तसेच त्याने शिवम दुबे, ड्वेन ब्रावो अशा काही खेळाडूंची नावेही घेतली. तसेच त्याने धोनीला विनंती करताना म्हटले की 'तुझा मोठा चाहता आहे. प्लीज सीएसकेचा कर्णधारपद कायम कर.'
खरंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट 2020 मध्येच निवृत्ती घेतली आहे. पण त्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली दिसलेली नाही. तो मोठा चाहता वर्ग मिळालेला खेळाडू आहे. त्याला चाहते कधी 'माही', कधी 'कॅप्टनकूल', कधी 'थाला' अशा नावानेही ओळखतात. त्याने आत्तापर्यंत केवळ आयपीएलमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे यश मिळवले आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार म्हणून भारताला 2007 साली टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकावरही आला होता.
त्याचबरोबर धोनीने 2008 पासून सीएसकेचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच धोनीने आयपीएलमध्ये 237 सामने खेळले असून 39.09 च्या सरासरीने 5004 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.