Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत महिनाभरापूर्वी एफसी गोवाने एटीके मोहन बागानचा फातोर्ड्यात तीन गोलने धुव्वा उडविला होता. आता कोलकात्यात त्यांना पुनरावृत्तीची नामी संधी आहे. उभय संघांतील परतीचा सामना बुधवारी (ता. 28) कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.
एफसी गोवा संघ सलग तीन सामने अपराजित आहे. त्यांनी ओडिशा (3-0) व नॉर्थईस्ट युनायटेडला (2-1) नमविले, तर जमशेदपूरला (2-2) गोलबरोबरीत रोखले. एटीके मोहन बागान संघाला मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडकडून एका गोलने धक्कादायक पराभव पत्करावा लागला. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावरच 12 ऑक्टोबर रोजी एफसी गोवाने ईस्ट बंगालला 2-1फरकाने पराजित केले होते.
एका गुणाचा फरक
एफसी गोवा व एटीके मोहन बागान यांच्यात सध्या फक्त एका गुणाचा फरक आहे. कोलकात्यातील संघाचे 20 गुण असून गोव्यातील संघाने 19 गुण प्राप्त केले आहेत. बुधवारी विजय मिळविणारा संघ गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवेल. प्ले-ऑफ फेरीत जागा मिळविण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी निकाल महत्त्वाचा असेल.
दोन्ही प्रशिक्षक आशावादी
एटीके मोहन बागानचे तिरी, जॉनी काऊको, मनवीर सिंग हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. खेळाडू जायबंदी असले, तरी आपला संघ चांगला खेळ करणार असल्याचा विश्वास एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो यांनी व्यक्त केला. एफसी गोवाची कसोटी पाहणारा सामना असेल, पण एटीके मोहन बागानविरुद्धच्या मागील लढतीत आपल्या संघाने सर्वोत्तम खेळ केला होता, त्यामुळे बुधवारच्या लढतीतही तीच ऊर्जा घेऊन मैदानात उतरू, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी नमूद केले.
दृष्टिक्षेपात...
- आयएसएल स्पर्धेत उभय संघांत 5 लढती, एटीके मोहन बागानचे 3, एफसी गोवाचा 1 विजय, 1 सामना बरोबरीत
- 20 नोव्हेंबर 2022 रोजी फातोर्ड्यात एफसी गोवा 3-0 फरकाने विजयी, ऐबान्भा डोहलिंग, महंमद फारेस अर्नौट, नोआ सदावी यांचा 1 गोल
- एटीके मोहन बागानचा ऑस्ट्रेलियन आघाडीपटू दिमित्री पेट्राटोस याचे 4 गोल, 5 असिस्ट
- एफसी गोवाचा नोआ सदावी याचे 5 गोल, 4 असिस्ट
- यंदा स्पर्धेत एफसी गोवाचे 19, तर एटीके मोहन बागानचे 15 गोल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.