19th Asian Games Hangzhou, 10th Day 3rd October, India Result :
चीनमधील 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही (3 ऑक्टोबर) भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे, विशेषत: ऍथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे.
मंगळवारी धावपटू पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत 15:14.75 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. पारुलचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे. तिने सोमवारी 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
तसेच मंगळवारी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकले. तिने 62.92 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम कामगिरीही ठरली.
याशिवाय मंगळवारी पुरुषांच्या डेकॅथलॉनमध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने दमदार कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली. 1974 नंतर पहिल्यांदाच भारताला डेकॅथलॉनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले आहे. त्याने 7666 पाँइंट्स मिळवत राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.
मंगळवारी पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत भारताच्या मोहम्मद अफझलनेही रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याने 1:48.43 वेळ नोंदवत दुसरा क्रमांक मिळवला. या शर्यतीत त्याचे सुवर्णपदक अवघ्या 0.38 सेकंदाने हुकले. या शर्यतीत सौदी अरेबियाच्या केझवानी एसा अली एस याने 1:48.05 वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताच्या प्रवीण चिथरावेलने कांस्य पदकाला गवसणी घातली. त्याची 16.68 मीटर उडी तिसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी सर्वोत्तम ठरली. तसेच विद्या रामराज हिने महिलांच्या 400 मीटर हर्डल शर्यतीत कांस्य पदक जिंकले.
त्याचबरोबर मंगळवारी सुरुवातीला पुरुषांच्या 1000 मीटर कॅनोए डबल प्रकारात भारताच्या अर्जून सिंग आणि सुनिल सिंग यांनी कांस्य पदक जिंकले. तसेच प्रीतीने महिलांच्या बॉक्सिंगमध्ये 54 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. तसेच बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या 92 किलो वजनी गटात भारताच्या नरेंदरने कांस्य पदक मिळवले.
याशिवाय मंगळवारी भारताने अनेक पदकेही निश्चित केली आहेत. भारताच्या महिला हॉकी संघाने साखळी फेरीत हाँग-काँग विरुद्ध 13-0 गोलफरकाने विजय मिळवला, तर पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाने बांगलादेशला 55-18 फरकाने पराभूत केले.
तिरंदाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवली. ज्योती सुरेखा वेन्नमने महिला कंपाउंड प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्याच आदिती स्वामीला 149-146 फरकाने पराभूत केले. त्यामुळे ज्योतीने पदक पक्के करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तसेच आदितीलाही कांस्य पदक जिंकण्याची संधी असून तिला त्यासाठी इंडोनेशियाच्या रातिह झिलिझाती फॅधली विरुद्ध सामना खेळावा लागणार आहे. तसेच अंतिम सामन्यात ज्योतीचा सामना कोरियाच्या चायवॉन सोविरुद्ध होणार आहे.
तसेच पुरुषांच्या कपाउंड प्रकारात भारताच्या ओजस प्रविण देवतळे आणि अभिषेक वर्मा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोघेच अंतिम सामन्यात आमने-सामने येणार असल्याने या प्रकारात भारताचे सुवर्ण आणि रौप्य पदक पक्के झाले आहे. ओजसने उपांत्य सामन्यात कोरियाच्या जेवॉन यांगला पराभूत केले, तर अभिषेकने जेहून जोला पराभूत केले.
त्याचबरोबर स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत दिपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग यांच्या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच अनाहत सिंग आणि अभय सिंग यांच्या जोडीनेही मिश्र दुहेरीत खेळताना उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही जोड्यांनी पदक पक्के केले आहे. याशिवाय सौरभ घोषालने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत पदक पक्के केले आहे.
बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 75 किलो वजनी गटात लवलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत थायलंडच्या बैसन मानिकोनला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे तिचेही पदक पक्के असून तिने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे.
दरम्यान, 10 व्या दिवसाखेर भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने आत्तापर्यंत 69 पदके जिंकली आहेत. यामध्ये 15 सुवर्ण, 26 रौप्य आणि 28 कांस्य पदके जिंकली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.