हिवाळा सुरू झाला, थंडीची चाहूल लागली की आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी सुरू होतात. आयुर्वेद या उपचार पद्धतीनुसार हिवाळा या ऋतूचा विचार करता वात विकार बळावणे आणि सर्दी-ताप होणे हे प्रामुख्याने भेडसावणारे त्रास आहेत. वात विकार हा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो. थंडीमुळे शरीरात आकडी भरणे, वातामुळे हाता-पायात मुंग्या येणे, सांधे दुखणे असे विकार बळावू शकतात. हिवाळ्यात गरम कपडे वापरणे हा उपाय जरी केला तरी गरम कपड्यांनी फार काही साध्य होत नाही. शेवटी गरम कपडे हा बाहेरून केलेला उपचार असतो. मुळातूनच शरीरातली उष्णता वाढवली तर मात्र थंडीचा फारसा त्रास होत नाही. आपल्या रोजच्या वापरातील असे बरेच पदार्थ असतात ज्यांचा आपण योग्य प्रमाणात वापर केला तर आपण हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहू शकतो. (winter home remedies health tips)
• स्वयंपाकघरातील औषधे:-
• मिरी
भूक वाढवणाऱ्या सर्व औषधांमध्ये मिरे हे उत्तम मानले जाते. सर्दी- खोकला सारखे विकार जडले असतील तर चिमूटभर मिऱ्याचे चूर्ण एका पेल्यावर गरम पाण्यासोबत घेतले असता खोकला थांबतो व सर्दीचा त्रास कमी होतो. तसेच हिवतापावर सुद्धा मिरी फार गुणकारी मानली जातात. तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे व 11 मिऱ्यांच्या दाण्याची पूड रोज तीन वेळा घेतली असता हिवताप लवकर बरा होतो.
• दालचिनी
सर्दी, थंडी-वाऱ्याचा ताप, खोकला अशा रोगांवर दालचिनीचा काढा सकाळ-संध्याकाळ दोन दिवस घेतल्यास बरे वाटते. दालचिनी एक ग्रॅम, लवंग एक ग्रॅम, सुंठ तीन ग्रॅम या प्रमाणात काढा तयार करून तो सकाळ संध्याकाळ घेतल्यास थंडी तापावर लाभदायक ठरतो.
• लवंग
कफहारक म्हणजेच कफ नाहीशी करणारी जी औषधे आहेत त्यात लवंग हे फारच मोठे औषध आहे. खोकला येत असताना नुसती एक लवंग तोंडात धरले असता खोकला कमी होतो. तसेच सारखे खोकून कफ पडत नाही अशावेळी चार-पाच लवंगा ठेचून चावून खाल्ल्या तर खोकला सुटतो व कफ पडून घसा मोकळा होतो. भूक लागण्यास सुद्धा लवंगा हे फार उत्तम औषध आहे. लवंगाचे चूर्ण एक ग्रॅम मधासोबत रोज सकाळी घेतल्यास थोड्याच दिवसात उत्तम भूक लागते.
• तुळस
कफ व तापाचा त्रास असता तुळशीचा रस सतत दोन चमचे 4 दिवस घेतला असता ताप कमी होतो. तुळस ही अग्नीदीपक आहे. म्हणून ज्याला भूक लागत नसेल त्याने रोज नेमाने तुळशीचा रस चार चमचे व दोन चिमूट खडीसाखर घालून सकाळी घेत जावा. सतत आठ दिवस हा प्रयोग केला असता भूक उत्तम लागते. श्वास म्हणजेच दमा लागत असेल तर तुळशीचा रस, खडीसाखर घालून घ्यावा, श्वास थांबतो. त्याचप्रमाणे सर्दीवर सुद्धा तुळस फार गुणकारी आहे. सात- आठ तुळशीची पाने, दोन- तीन मिरी ठेचून आठ वाट्या पाण्यात घालून ते मिश्रण चांगले शिजवावे व त्याची एक वाटी होईपर्यंत आटवावे. असा काढा रात्री झोपण्या वेळी गरम गरम प्यावा. या उपायाने घाम येतो व ताप, सर्दी, कफ यापासून आराम मिळतो.
(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.