खरी कुजबुज: पत्‍नीचे सॉफ्ट लाँचिंग?

Khari Kujbuj Political Satire: मडगावांतील राजकारण आमुलाग्र बदललेले आहे त्यामुळे येथे मोठ्या उत्साहाने आलेल्या मुख्याधिका-यांना एक तर घालविले तरी जाते वा ते स्वतः होऊन येथून बदली मागून जात असतात
Khari Kujbuj Political Satire: मडगावांतील राजकारण आमुलाग्र बदललेले आहे त्यामुळे येथे मोठ्या उत्साहाने आलेल्या मुख्याधिका-यांना एक तर घालविले तरी जाते वा ते स्वतः होऊन येथून बदली मागून जात असतात
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

पत्‍नीचे सॉफ्ट लाँचिंग?

आगामी विधानसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू होऊ शकते आणि कुंकळ्ळी मतदारसंघ महिलांना राखीव होऊ शकतो, असे सूतोवाच युरीबाबांकडे भाजपच्या एका नेत्याने केल्यानंतर युरींनी आपले लक्ष कुडतरी मतदारसंघावर केंद्रित करण्याचे ठरवल्याची चर्चा सुरू होती. त्यातच युरीबाबांनी आपल्या पत्नीला गृहआधार योजनेची मंजुरीपत्रे वाटण्याच्या कार्यक्रमाला आणल्याने व त्यांचे फोटो समाजमाध्यमावर टाकल्याने पत्‍नीसाठी युरीबाब कुंकळ्ळीची तयारी करीत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यापूर्वी आलेमाव कुटुंबातील चारजणांनी एकदम निवडणूक लढविल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर ‘फॅमिली राज’चा ठपका बसला होता. आता त्‍याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? ∙∙∙

मेल्विनबाबांसमोर नवे आव्हान

मडगाव नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून मेल्वीन व्हाज यांनी सूत्रे हाती घेतली खरी पण त्यांच्या समोर नगरपालिकेतील कामकाजात सुसूत्रता आणणे, हे जसे महत्वाचे काम आहे पण त्याहून मोठी जबाबदारी रहाणार आहे ती नगरपालिकेची तीस कोटींवर पोहचलेली थकबाकी वसूल करण्याची. तसे ते मडगावसाठी जसे नवे नाहीत त्याचप्रमाणे त्यांनाही येथील कामकाजाची व येथील राजकारणाची बरीच माहिती आहे. कारण दोन हजारच्या काळांत त्यांनी येथील हीच जबाबदारी हाताळलेली आहे. पण तो काळ व आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या मागील कारण मडगावांतील राजकारण आमुलाग्र बदललेले आहे. त्यामुळे येथे मोठ्या उत्साहाने आलेल्या मुख्याधिका-यांना एक तर घालविले तरी जाते वा ते स्वतः होऊन येथून बदली मागून जात असतात. त्यामुळे मेल्विनबाब येथील जबाबदारी कशी काय सांभाळतात त्या बद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. अर्थात राजकारणी वा विविध संघटनांना कसे हाताळावे याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे व ते जाणूनच त्यांना येथे आणले गेले असावे व त्यांनाही त्याची पूर्ण जाणीव असावी, असे दिसते. ∙∙∙

कहाणी कोऱ्या कागदाची

कृषिमंत्री रवी नाईक हे मिश्कील कोट्या करण्यात माहीर. कोणत्याही गंभीर विषयाला कोपरखळीने हलके फुलके कसे करावेत, हे त्यांच्याकडून शिकावे. गोमंतक भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वातील समितीच्या उपस्थितीत माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते रवी नाईक यांनी निवेदन स्वीकारले. याचा अनेकांना राग आला. सोमवारी झालेल्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला. त्यावेळी निवेदन दाखवा, असा गलका झाला. त्यावर निवेदन कोणते? अशी विचारणा झाली. छायाचित्र तर काढायचे होते, मग दिला एक कोरा कागद फाईलवर ठेवून आणि टिपले छायाचित्र, असा खुलासा झाला. त्यामुळे तो विषय मिटला तरी, एवढी तयारी करून गेलेले निवेदन न घेताच कसे गेले, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. कोऱ्या कागदाचा हा किस्सा संपता संपेना. ∙∙∙

पणजी महापालिका नामानिराळी!

राज्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीतही जागोजागी पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार हे आजही दिसून आले. बांबोळी येथील उड्डाण पूल झाल्यानंतर गोमेकॉ इस्पितळाच्या डीन कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारापाशी ढोपरभर पाणी साचले होते व त्यातून वाहन चालक वाहने रेटत होते. त्यामुळे एका बाजूने राज्याचा विकास होत असताना त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पणजी बसस्थानकाच्या ठिकाणीही पाणी जाण्यास वाट नसल्याने पाणी साचले. त्यामुळे लोकांचे बरेच हाल झाले. पणजी महापालिकेकडून रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. पणजीचे स्थानिक आमदार व महापौर हेही बेफिकीर बनले आहेत. त्यांनाही याचे सोयरसुतक नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे सुरू असल्याने त्याचे खापर महापालिकेने त्यांच्यावर फोडून आपण मात्र नामानिराळी झाली आहे. ∙∙∙

सुदिन यांचे कार्यकर्ते ‘चार्ज’

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावरील ‘गोमन्तक’तील ‘त्या’ लेखामुळे सुदिन यांचे कार्यकर्ते भलतेच चार्जड झालेले दिसू लागले आहेत. खासकरून मडकईतील कार्यकर्ते. पात्रावांनी ( रवी फोंड्याचे पात्राव तसे सुदिन मडकईचे) आगामी निवडणुकीत तरी मुख्यमंत्री व्हावे, म्हणून त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे म्हणे. बघूया आता त्यांचा तीर ‘लक्ष्यावर’ लागतो का?. अर्थात ही भविष्यात डोकावणारी गोष्ट, पण त्या लेखामुळे सध्या म. गो. कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे, हेही नसे थोडके. ∙∙∙

समर्थनार्थ चढाओढ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्याविरोधातील राजकीय कट कारस्थानाचा आरोप केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सर्व मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. हळूहळू अन्य मंत्रीही पक्षशिस्तीमुळे असाच राग आळवतीलही. शिरोडकर यांनी स्वयंस्फूर्तीने आपण हे निवेदन करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्याचे म्हटले असले, तरी ते त्यांच्या मनाला तरी पटले असेल का, याची शंका आहे. मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ आरोग्यमंत्री व मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्वजित राणे भाजप कार्यालयात कधी पत्रकार परिषद घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙

उठसूठ विरोध पडला महागात

कुटबण जेटीचा प्रश्न हळूहळू सुटत चाललेला असला तरी तेथे उभारलेल्या पण अजून वापरांत न आणलेल्या नव्या जेटीचा मुद्दा मात्र चर्चेत रहाणार, असे संकेत मिळत आहेत. कुटबण मधील वाढता व्याप लक्षांत घेऊन तेथे नवी २०० मीटरहून अधिक लांबीची ही जेटी २०१८ मध्ये बांधण्यात आली. तिच्या लांबी प्रमाणेच तिची रुंदी भरपूर रहाणार होती व त्यावर सहा व त्याहून अधिक चाकांच्या मालवाहू वाहनांची सोय रहाणार होती. पण ती जेटी कोळसा हाताळणी व कॅसिनोंसाठी असल्याचा कांगावा करून त्याला मोठा विरोध झाला व परिणामी तिची रुंदी कमी केली गेली. त्यामुळे आता तेथे मोठी मालवाहू वाहने आणता येत नाहीत त्यामुळे तिचा तसा उपयोगही होत नाही त्यांतूनच ती वापरात आणली गेली नाही. ती पूर्वींच्या आकारांत झाली असती तर आज कुटबणवर जी गैरसोय होते ती झाली नसती तसेच नव्या समस्याही उद्‍भवल्या नसत्या पण ते विरोधासाठी व तोही अंधपणे विरोध करणाऱ्यांना कोण सांगणार, अशी प्रतिक्रिया या जेटीसाठी अगोदर आग्रह धरणारे व्यक्त करत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: मडगावांतील राजकारण आमुलाग्र बदललेले आहे त्यामुळे येथे मोठ्या उत्साहाने आलेल्या मुख्याधिका-यांना एक तर घालविले तरी जाते वा ते स्वतः होऊन येथून बदली मागून जात असतात
खरी कुजबुज: रवी नाईक पुन्हा फोंड्याचे आमदार?

मायकलबाब गप्प का ?

आमदार मायकल लोबो, दिलायला लोबो आणि केदार नाईक हे ‘रेंट -अ-कार’चा विषय घेऊन पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात गेले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत राज्यात दर दिवशी ‘रेंट -अ-कार’च्या घटना चुकीच्या कारणांसाठी ऐक येतात. पर्यटक मद्यधुंद होऊन, नियमांची पायमल्ली करून कायद्याचे वोटाळे करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मुख्य म्हणजे कळंगुट, शिवोली आणि साळगाव मतदारसंघात या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. आमदार मंडळी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात पर्यटकांची सतवणूक करू नका, म्हणून सांगायला पोहोचली. परंतु गोवेकरांना खासकरून त्यांच्या मतदारांना पर्यटकांकडून होत असलेला त्रास दिसत नसून सोशल मीडियावर या मंडळीच्या नावाने रणशिंग फुकले जात असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com