

मडगाव: मीराबाग - सावर्डे येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात ग्रामस्थांचे रविवारी २७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी युरी यांनी केली आहे.
आलेमाव म्हणाले, की सरकारने लोकांशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांना आपल्या मागण्यांसाठी दररोज आंदोलन करावे लागणे, ही दुर्दैवी बाब आहे. आंदोलनकर्त्यांचा संयम सुटू लागला असून हा प्रश्न लवकर सोडविला नाही तर त्याचे मोठ्या आंदोलनात रूपांतर होऊ शकते. ग्रामस्थांच्या शंका-आक्षेपांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, असे आवाहनही अलेमाव यांनी केले.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीतून निदर्शने करणाऱ्य त्या चारही जणांना प्रशासनाने सशर्त मुक्त केले असून, कुडचडे पोलिस स्थानकात दररोज हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
मीराबाग आंदोलकांना सहकार्य केल्याचा संशय असल्याने सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊसकर यांना पर्वरी पोलिसांनी समन्स बजावले असून , (ता. ९) पर्वरी स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे. मीराबाग येथील आंदोलकांनी विधानसभेत निषेध फलक दाखविल्यावर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून याच प्रकरणात पाऊसकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
निदर्शने करण्यासाठी आम्ही आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून विधानसभेचे पास घेतले खरे; मात्र आमचा हेतू आमदार सरदेसाई यांना माहीत नव्हता. आम्ही जी कृती केली, ती केवळ सरकारचे लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी होती, असे ‘त्या’ चार आंदोलकांनी पत्रकारांना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.