पणजी : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातला सिन गोव्यात (Goa) झालाय. या चित्रपटात डॉक्टर होण्यासाठी प्रत्यक्षात कुणीतरी भलताच परीक्षा देत असतो, हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार गोव्यात घडला. मात्र फरक एवढाच की, यावेळी परिक्षा डॉक्टरची नसून बँकेची नोकरी मिळवण्यासाठी होती.
बँकेची नोकरी मिळवण्यासाठी चक्क कोकणी भाषा समजणाऱ्याला बसवून फसवणूक करण्याच्या प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रयत्न फसला. त्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया गोवा (BOI) विभागाच्या लिपिक (क्लर्क) पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. मात्र त्या परिक्षेत तोतयागिरी करून परिक्षकांना चुना लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीला परीक्षार्थी बनवून कोकणी भाषा प्रवीणता चाचणीत परिक्षा उत्तीर्ण झाल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी राजस्थान येथील विपीन कुमार मीणा याला अटक केली. संशयित मीणाला येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बँक ऑफ इंडिया गोवा विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक पी. टी. एस.एस. एन. शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. नुकतीच बँक ऑफ इंडियाच्या लिपिक पदासाठी भरती घेण्यात आली आहे. त्यासाठी बँकेने एजन्सीला भरतीप्रक्रिया पुर्ण करण्यास सांगितले होते. त्यानुसार लिपिक पदासाठी 5 डिसेंबर 2020 रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 28 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. यात राजस्थान येथील विपीन कुमार मीणा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला इतर भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी तसेच कोकणी भाषा प्रवीणता चाचणी देण्यासाठी 30 जून 2021 रोजी बोलावण्यात आले होते. त्यावेळी चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली नसल्यामुळे त्याला तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती.
6 सप्टेंबर रोजी त्याची भाषा प्रवीणता चाचणी घेण्यात आली. त्या वेळी तो चाचणी परीक्षा पास झाला. त्याला नियुक्तीपत्र देऊन 7 सप्टेंबरला जॉइन होण्यास सांगितले. 7 तारखेला विपीन कुमार मीणा जॉइन होण्यासाठी आला असता, संबंधित व्यक्तीने परीक्षा दिली नसल्याचे आढळून आले. भरती प्रक्रियेत तोतयागिरी करून पद मिळविल्याचे स्पष्ट झाल्याने बँकेने त्याच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब यांनी संशयित विपीन कुमार मीणा याच्या विरोधात भा.दं.सं. कलम 419 आणि 420 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संशयिताला पोलीस कोठडीसाठी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.