
पणजी: मागील आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने गोव्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने गुरुवारी (ता. १२) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. परिणामी, गोवा वेधशाळेने 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आणि शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गरज असल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडण्याचा, वीजपुरवठा खंडित होण्याचा आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असल्याने वाहनधारक व सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या पावसाच्या इशाऱ्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने नागरिकांसाठी महत्वाची माहिती जाहीर केली आहे. सध्या बीएसएनएलच्या दूरध्वनी लाइन्समध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी '१०१' क्रमांक वापरण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत खालील पर्यायी संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १०१ क्रमांक कार्यरत असला तरी नागरिकांनी ७३९१०४७१३२ व ६७३९१०४७१७२ या नव्या क्रमांकांवरही संपर्क साधावा.
गोव्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, मदतीसाठी तयार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.