
पणजी: आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ गोव्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिकांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज किमान १५ मिनिटे योगाभ्यास करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत २०४७' अभियानाचा योग हा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक संस्थांद्वारे शालेय शिक्षकांना योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. "मी या शिक्षकांना विनंती करतो की, त्यांनी दररोज किमान १५ मिनिटे विद्यार्थ्यांसोबत शाळेत योगाभ्यास करावा,".
नियमित योगाभ्यासाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि ते शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 'फिट इंडिया' हे 'विकसित भारत २०४७' अभियानाचाच एक भाग असल्याचे सांगत, प्रत्येक तरुणाने शारीरिकदृष्ट्या निरोगी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. केवळ शिक्षकांच्या किंवा योग प्रशिक्षकांच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी योगाभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अभियानामुळे आज जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये योग दिन साजरा केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले. "योग हे भारताने जगाला दिलेले सर्वात मोठे आणि मौल्यवान असे एक वरदान आहे. योगाच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणले आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे," असे ते म्हणालेत.
योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावा, असे म्हणत त्यांनी एक नियमित योगसाधक म्हणून मी सांगू शकेन की, योगामुळे आनंद आणि कल्याण वाढते, तसेच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुधारते, असेही नमूद केले.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या तंदुरुस्तीसाठी दररोज किमान अर्धा तास योगासाठी द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्या प्रत्येक घरात वाढणाऱ्या रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांवर योग हा एक प्रभावी उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
जागतिक योग दिन २०२५ च्या निमित्ताने पणजीमध्ये शेकडो लोकांनी प्राचीन योगाभ्यासात सहभागी होऊन भारताच्या शाश्वत ज्ञानाला आणि सर्वांगीण कल्याणाच्या प्रतीकाला स्वीकारल्याचे दृश्य हृदयस्पर्शी होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली योगाने सीमा ओलांडल्या असून, आज तो आरोग्य, सामंजस्य आणि शांतीचा एक वैश्विक मार्ग म्हणून जागतिक स्तरावर उभा आहे, असे राणे यांनी नमूद केले.
योग तज्ञांशी संवाद साधताना तसेच पहिल्यांदाच सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांच्या 'योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारण्याच्या' आवाहनातून प्रेरणा घेताना त्यांना आनंद झाल्याचे राणे यांनी सांगितले. अशा उपक्रमांद्वारे गोवा कल्याण आणि प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साखळी येथील मल्टिपर्पज सभागृहातही जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आध्यात्मिक ध्यानधारणा आणि योग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
शारीरिक बळ, मानसिक स्थिरता आणि अध्यात्म या त्रिसूत्रीची सांगड घातल्यास आपले शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य सुदृढ राहील, असे ते म्हणाले. सुलक्षणा सावंत यांनी जीवनात योगाला मोठे महत्त्व असून, त्याचा आनंद लुटण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थी वर्गाने योगाचे महत्त्व ओळखून दैनंदिन जीवनात योग व अध्यात्म यांचा समावेश केल्यास भविष्यात ते यशस्वी होऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.
पर्ये मतदार संघातर्फेही आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. दिव्या राणे यांनी भूषवले. योग प्रशिक्षक प्रदीप गवंडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची विविध आसने सादर करण्यात आली. आमदार डॉ. राणे यांच्यासह पर्ये मतदार संघातील सरपंच, पंच सदस्य, तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आणि इतर मान्यवरांनीही सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनीच योगाचे महत्त्व जाणून घेत विविध योगासनांमधून आरोग्यवर्धनाचा संदेश दिला.
पेडणे येथील सावळवाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात मांद्रेचे आमदार जित अरोलकर यांच्यासह अनेक मान्यवर, योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योग म्हणजे आपली जागरूकता वाढवणे, बुद्धी तीक्ष्ण करणे आणि अंतर्ज्ञानाची क्षमता वाढवणे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.