

म्हापसा: शिक्षणातून केवळ पदव्या न देता जबाबदार, संवेदनशील आणि नीतिमान नागरिक घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जगातील भौगोलिक सीमा जवळ आल्या; मात्र मने जोडण्यात आपण मागे पडलो आहोत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचे पालन करूनच विश्वशांती साधता येईल.
त्यामुळे जागतिक शांतता आणि मानवाच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (गोवा) आणि युनेस्को चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने थिवीत आयोजित ‘दीर्घकालीन विकास आणि विश्वशांतीसाठी गोव्यातील सामाजिक संस्था, संप्रदाय आणि आंतरधर्मीय संवाद’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते.
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सजग आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत पिढी घडविणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
‘डब्ल्यूपीयू’चे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी शिक्षणातून सामाजिक उत्तरदायित्व निर्माण होते. त्यामुळे सर्वधर्मसमभावाची भावना शिक्षणव्यवस्थेत रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. रविराज सीताराम यांनी मूल्याधिष्ठित ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यावर भर दिला. डॉ. संजय उपाध्ये यांनी आंतरधर्मीय संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर, डॉ. मालापती जनार्धनम, डॉ. रविराज सीताराम, डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. मिलिंद पात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.
साधता येईल शाश्वत विकास!
न्याय, अहिंसा आणि परस्परांबद्दल आदर ही सर्व धर्मांची मूलभूत तत्त्वे आहेत. लोकशाही मानवी प्रतिष्ठेचा पाया असून, सर्वधर्मसमभावावर आधारित शिक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन यांतून शाश्वत विकास साधता येईल, असेही राज्यपालांनी नमूद केले.
ठराव एकमताने मंजूर
या परिषदेत वाढत्या हिंसाचाराला आळा घालणे, गोव्याचा सांस्कृतिक वारसा जपणे, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, जमिनीचा ऱ्हास रोखणे, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण यांसंबंधी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विज्ञान आणि अध्यात्मावर आधारित जागतिक मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्थेच्या स्थापनेचाही ठराव मंजूर झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.